मुंबई - राज्याच्या राजकारणात आणि शिवसेना पक्षात सर्वात मोठं बंड झाल्याचं देशाने पाहिलं. या बंडानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्षांना घेऊन शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदेगट विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले एकमेव आमदार शंकराराव गडाखही आता शिंदे गटात जातात की काय, अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदार तर काही मंत्रीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात गेले आहेत. त्यामध्ये, आमदार बच्चू कडू आणि राजेंद्र येड्रावकर यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेला पाठिंबा दिलेले आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळालेले शंकरराव गडाख हे राज्यातच होते. गडाख ना गुवाहाटीला होते, ना मातोश्रीवर दिसले. ते आजारी असल्याने मुंबईतील घरीच विश्रांती घेत होते. मात्र, ते शिंदे यांच्या गटासोबत नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे सांगण्यात आले होते. आता, गडाख हेही शिंदे गटाच्या वाटेनं निघालेत की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शंकरराव गडाख नगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. त्यांनी आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढविली होती. भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडीची स्थापना होण्यापूर्वीच त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पुढाकारतून गडाखांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. पुढे महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने आता ते केवळ मंत्रीच राहिले आहेत. त्यातच, शंकरराव गडाख यांच्या आवाहनाची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानुसार, राज्यातील राजकीय घडामोडींसदर्भात ते सोमवारी कार्यकर्त्यांशी आणि पत्रकारांशी संवाध साधणार आहेत.
मला आपल्याशी बोलायचंय..!
नमस्कार,गेल्या काही दिवसांपासुन घडलेल्या घटना, त्यातुन झालेले आरोप-प्रत्यारोप, सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोंडीवर मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे.
सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी सकाळी ९.३० वा.मुळा पब्लिक स्कुल, सोनई येथे.. आवर्जुन उपस्थित रहावे ही विनंती.
-शंकरराव गडाख पाटील
अशा आशयचा मेसेज त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना टॅग करुन शेअर केला आहे. त्यामुळे, शंकरराव गडाख काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.