Eknath Shinde: 'देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं', उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:24 PM2022-07-08T16:24:01+5:302022-07-08T16:25:46+5:30
उद्धव ठाकरेंनी एखादी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करतानाच बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे चक्क आभार व्यक्त केले. तर, धनुष्यबाण हे चिन्हे शिवसेनेचेच राहिल, असा विश्वासही त्यांनी शिवसैनिकांना दिला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदेगटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी एखादी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही. कारण, मी आज या उंचीवर त्यांच्यामुळेच पोहोचलो आहे. एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतलाय, तो शिवसेना वाचविण्यासाठीच केलेला आहे. एकनाथ शिंदेंनी अद्याप एकदाही शिवसेनेवर टिका केली नाही. धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावं म्हणून त्यांनी कुठेही प्रयत्न केला नाही. महाराष्ट्रातील जनतेनं संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले. दरम्यान, मी 12 ते 13 दिवसांनंतर माध्यमांसमोर आलो आहे. कोण कुणाला मंत्री करतोय हे माहिती नाही. पण, माझ्यावर एखादी जबाबदारी टाकल्यास मी नक्कीच यशस्वीपणे पार पाडेल, असेही सामंत यांनी सांगितले.
बैठकीत फडणवीसांनीच सांगितलं
उद्धव ठाकरे आणि ठाकरें कुटुंबीयांवर झालेल्या टीका टिपण्णीचं आजही आम्हाला दुख आहे. आमच्या बैठकीतही आम्ही सांगितलंय, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं आमच्यासमोर भाषण झालं. त्यावेळी, ठाकरे कुटुंब आणि ठाकरे कुटुंबातील एकाही सदस्यांवर टिका होऊ नये, एवढा आदर त्यांचा राखला पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. एखादा कोण टिका करत असेल तर ही गोष्ट आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. "ज्यांनी बंडखोरी केली ते आजही माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यांना आजही माझ्याबद्दल प्रेम वाटत आहे. ठाकरे कुटुंबीयांबद्दल आदर वाटत आहे. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात जोडून बंडखोरांचे आभार व्यक्त केले. पण ज्यावेळी माझ्या कुटुंबीयांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली गेली त्यावेळी यातला एकही जण बोलला नव्हता. तेव्हा तुमची दातखिळी बसली होती का?, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना लगावला.
धनुष्यबाण हिरावू शकत नाही
"धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले.