‘कधी तरी तुम्ही आत्मपरीक्षण करा’मुंबई : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले असून, यापुढे तरी तुमच्यात सुधारणा घडू द्या, असा सल्ला दिला आहे. आम्ही ५० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक व लाखो शिवसैनिक चोर आणि तुम्ही एकटे साव, असे विचारत कधी तरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणार की नाही, असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना केला.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे की अल्पमताला? आमच्याकडचे बहुमत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, तुम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीवरचा आरोप करू शकत नाही, खरे म्हणजे लोकशाहीला तुम्ही घातक आहात, लोकशाहीचा खून तुमच्या अशा वक्तव्यातून घडतो आहे, अशी टीका शिंदेंनी ठाकरेंवर केली.
सोडून गेले, ते गुन्हेगार उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि त्यांच्या गटाचा चोर असा उल्लेख केला आहे. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की, तुम्हाला सोडून गेले, ते गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर, हे असे कसे होऊ शकते, याचा विचार करा आणि स्वतःमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करा, एवढा माझा सल्ला आहे.
धनुष्यबाण सोडविलाउद्धव ठाकरेंनी २०१९ला हा धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आज आम्ही सोडविला आहे. आता त्यांचा सहानुभूती मिळण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये, म्हणून केलेला हा प्रयत्न आहे, असेही शिंदे म्हणाले.
‘सुप्रीम कोर्टात दाद मागणार’मुंबई : निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होत नाही तोपर्यंत निर्णय घेऊ नये, अशी मागणी आम्ही केली होती. पण तरीही आयोगाने दिलेला हा निर्णय अनपेक्षित आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर कोणीही धनाढ्य माणूस आमदार, खासदार विकत घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या निर्णयाने देशातील लोकशाहीच संपुष्टात येत आहे.
चोर हा चोरच असतोनिवडणूक आयोगाच्या निकालानंतर चोरांना आनंद झाला आहे. चोरांना वाटेल की शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाले. काही दिवस त्यांना आनंद होईल, पण अखेर विजय सत्याचाच होईल. चोराला राजमान्यता देणे हे भूषणावह वाटत असेल पण चोर हा चोरच आहे, असे ठाकरे म्हणाले.
हा कट आहेकाही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सांगितले की ‘’द्या ब्रेकिंग न्यूज... धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार.’’ मग हा एक कट आहे का? या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरचे लोक सामील झालेले आहेत हे जनतेला समजत आहे. शिवसेनेचे चिन्ह त्यांना कागदोपत्री मिळाले असले तरी खरा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे.