Join us  

Eknath Shinde: "महाराष्ट्राचे स्थान शेवटच्या रांगेत अन उत्तर प्रदेश पहिल्या, वाईट वाटलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 7:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी सध्या चांगलीच चर्चेत असते. कधी मंत्रिमंडळ विस्तारामुळे, कधी आरक्षणासाठीच्या दौऱ्यांमुळे तर कधी दिल्ली दरबारी पंतप्रधानांची भेट न झाल्यामुळे. आता, निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मान-सन्मानामुळे त्यांची दिल्लीवारी चर्चेत असून त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत असल्याने अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही हा फोटो ट्विट करुन, हे पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. ही बैठक सकाळपासून ते सायंकाळपर्यंत चालली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी 2047 साठी भारताचे लक्ष्य काय असावे, यासह अनेक विषयांवर भाष्य केले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. आता, याच बैठकीदरम्यानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरुन, या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन खोचक टोला लगावला आहे. 

"दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा" हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा हा फोटो आहे, शिंदे साहेब वाईट वाटले असे ट्वीट आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना दिल्ली दरबारी म्हणजे औरंगजेब बादशाहकडून अपमानाची वागणूक देण्यात आली होती. सरदारांच्याही नंतर त्यांना स्थान देण्यात आले होते. त्यावेळी, महाराजांनी स्वाभिमान दाखवत औरंगजेब बादशाहच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सुनावले होते. त्यानंतर, शिवाजी महाराजांना कैद करण्यात आले, हा इतिहास आहे. आमदार मिटकरी यांनी याच इतिहासाची आठवण आपल्या ट्वीटद्वारे करून दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणाही साधला.

काय म्हणाले रोहित पवार - 

"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेनिती आयोगअमोल मिटकरीसोशल व्हायरल