मुंबई/सूरत - शिवसेनेतील बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही मंत्री आणि आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवार रात्रीपासून सूरत येथे असलेले शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार गेले आहेत. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याला, आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी फोटोंच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे या फोटो एकनाथ शिंदेंच्या राईट हँडला मंत्री बच्चू कडू आहेत. तर पहिल्याच रांगेत नाराज आमदार तानाजी सावंत हेही दिसून येतात.
सूरत येथून गुवाहाटी येथे रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी हॉटेलमध्ये काढलेला फोटो समोर आला आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदेंसोबत अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, शंभुराज देसाई आणि बच्चू कडू हे मंत्री तर प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, सुहास कांदे यांच्यासह शिवसेनेचे इतर आमदारही दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३३ आणि बच्चू कडू व त्यांचे समर्थक असलेले एक आमदार आणि इतर एक आमदार असे मिळून ३६ आमदार आहेत. मात्र, शिवसेनेनं मंत्रीपद दिलेले अपक्ष आमदार बच्चू कडू या फोटोत दिसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
विशेष म्हणजे या फोटोत बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या राईट हँडला बसलेले दिसतात. त्यामुळे, मिशन सूरत मोहिमेचे राईट हँड बच्चू कडू नाहीत ना, असा सवालही यानिमित्ताने चर्चिला जात आहे. तर, शिवसेनेत नाराज असलेले आमदार आणि मंत्रीपद नाकारलेले नेते तानाजी सावंत हेही या पोटोत पहिल्याच लाईनमध्ये दिसून येतात. काही दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असताना तानाजी सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जाहीरपणे टिका करत आपली नाराजी जाहीर केली होती.
शिवसैनिकांचं हे बंड नाही, आम्ही शिवसेनेतच
दरम्यान, गुवाहाटीकडे रवाना होताना एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांनी कुठलंही बंड केलेलं नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणार नाही. तसेच कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची शिकवण याच्यासोबत आम्ही कधीही फारकत घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.