Join us

Eknath Shinde: एकनाथ शिंदे नॉट रिचेबल?, शिवसेनेच्या मुंबईतील नेत्याकडून आली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 9:12 AM

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले.

मुंबई -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र, या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. त्यानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर, भाजप नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही समजते. याप्रकरणी शिवसेनेकडून एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.  

''एकनाथ शिंदेंना आपण अनेक वर्षे ओळखतो. पक्षासाठी ते सदैव कार्यमग्न असतात, परिश्रम घेत असतात. विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी मिळूनच याबाबतचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे, काही वेळातच एकनाथ शिंदे संपर्कात असतील,'' अशी ग्वाही शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 'अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल गैरसमज पसरवू नयेत, कारण शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार निवडून आले आहेत. पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतले आहेत, त्यामध्ये जीवाला जीव देऊन एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे, माझी सर्वांना विनंती आहे की, हवेतील बातम्या पसरवू नयेत,' असेही निलम गोऱ्हेंनी म्हटले.   

शिंदे मतदानालाही उशिरा आले

एकनाथ शिंदे मतदानासाठी देखील उशिरा सभागृहात आले होते. तर, मतमोजणीवेळीही ते उपस्थित नव्हते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, असे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली असून काँग्रेसचीही मतं शिवसेनेनं फोडली आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, खदखद आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले.

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेमुंबईनीलम गो-हे