मुंबई - शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आजतागायत दसरा मेळाव्याची परंपरा राहिली आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे विचारांचं सोने लुटण्यासाठी दादरच्या शिवतीर्थावर सभा घ्यायचे. या सभेला राज्यभरातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी लोक उपस्थित राहायचे. बाळासाहेबांच्या निधनानंतर हा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेऊ लागले. परंतु यंदाचा मेळावा शिवसेनेतील २ गट घेणार आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने बीकेसी इथे तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला आहे.
दसरा मेळाव्यात मुंबईचा डबेवाला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी प्रत्येक वर्षी न चुकता जायचे. परंतु यंदा शिवसेनेतील २ गटात दसरा मेळावा होत असल्याने कुणाच्या दसरा मेळाव्याला डबेवाला जाणार ही उत्सुकता आहे. त्यावर मुंबईच्या डबेवाल्याने भाष्य केले आहे. मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, शिवसेना हा पक्ष असला तरी आमच्यासाठी मराठी माणसांसाठी लढणारी संघटना आहे. दरवर्षी आम्ही बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी दसरा मेळाव्याला जायचो. मात्र यंदा दोन्ही दसरा मेळाव्यापासून दूर राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण उद्धव ठाकरे असो वा एकनाथ शिंदे आमचं कुणाशी वैर नाही. दोन्हीही आमच्या जवळचे आहेत असं सांगितले. तसेच शिवसेनेत दोन गट होऊ नये हीच आमची इच्छा होती असं डबेवाले म्हणाले. तर दुसरीकडे मुंबई डबेवाल्यांच्या दुसऱ्या संघटनेने आम्ही शिवतीर्थावरील उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले दसरा मेळाव्यात तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे. शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहेआधी कोण बोलणार?दोन्ही मेळाव्यांची वेळ साधारणत: सारखीच आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे बोलणार की एकनाथ शिंदे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ठाकरे यांचे साधारणत: ८ ला सुरू होते. त्यांचे भाषण झाल्यावर त्याला शिंदे यांनी तडाखेबंद उत्तर द्यावे, असा शिंदे गटाचा प्रयत्न असेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"