Maharashtra Political Crisis: “जयंतराव, अजितदादांना विचारलं का? तुम्हाला विरोधीपक्षनेता होता आलं का?”; CM ऑफरवर शिंदेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 05:27 PM2022-08-25T17:27:53+5:302022-08-25T17:29:17+5:30
Maharashtra Political Crisis: जयंतराव, तुम्हाला साधे विरोधी पक्षनेता तरी होता आले का? त्याचे दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते, या शब्दांत एकनाथ शिंदेंनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आरोपांना सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदेंना महाविकास आघाडीतून थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफरच दिली होती. यावर, मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यापूर्वी तुम्ही अजित पवारांना विचारले होते का, अशी खोचक विचारणा करत थेट वर्मावरच बोट ठेवले.
भाजपने तुम्हाला मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केले आहे. एकनाथराव तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्या कोणताही दगड न ठेवता मुख्यमंत्री करतो, अशी ऑफरच जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना दिली होती. जयंत पाटील यांच्या भाषणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. तुम्ही मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण अगोदर अजितदादांना विचारले का? कारण दादांची दादागिरी नेहमी चालते. ती चालायला देखील हवी, कारण ते आमचे मित्र आहेत. पण जयंतराव तुम्हाला साधे विरोधी पक्षनेता तरी होता आले का? तुम्हाला विरोधी पक्षनेते होता आले नाही, याचे दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. तुम्ही राष्ट्रीय प्रवक्ता असल्यासारखेच बोलत सुटला होतात, असा खरमरीत टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
होय, मी कंत्राटी मुख्यमंत्रीच
माझा कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत काही विधान केले म्हणून त्यांना थेट जेवणावरून उचलून तुरुंगात टाकले होते. कशासाठी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला म्हणून. पण आम्ही घटनेप्रमाणे, कायद्याप्रमाणे बहुमत सिद्ध करून पदावर बसलोय. आम्ही कायद्याविरुद्ध कुठलेही पाऊल उचलणार नाही. हो मी कंत्राटी मुख्यंमंत्री आहे. राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचे कंत्राट घेतले आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांच दु:ख दूर करण्याचे कंत्राट घेतले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे. बाकी असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड केल्याबाबत जयंत पाटील नाराज होते, असे सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाल्याचेही बोलले जात होते. यावेळी शरद पवार यांनी स्वतः मध्यस्थी करून जयंत पाटील यांची नाराजी दूर केली होती. हाच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जयंत पाटील यांच्यावर टीका करत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गटबाजी आणि वाद असल्याचे सूतोवाच करून जयंत पाटील यांच्या वर्मावरच बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.