Join us

४० आमदार महाराष्ट्राबाहेर गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही; MIM चा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 3:32 PM

बळजबरीनं आमदारांना घेऊन गेले असं होऊ शकत नाही. इतके सगळे आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातला गेले कसे? असा सवाल MIM खासदारांनी विचारला आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत थेट गुजरातला पोहचले. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे समर्थक आमदारही होते. इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार महाराष्ट्र सोडून गेले तरी याची भनक सरकारला काहीही नाही असा सवाल MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारला आहे. 

माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, बळजबरीनं आमदारांना घेऊन गेले असं होऊ शकत नाही. इतके सगळे आमदार महाराष्ट्र सोडून गुजरातला गेले कसे? सरकारला काहीही भनक नाही. सर्व आमदारांना पोलीस संरक्षण आहे. नियमाप्रमाणे जिल्हा सोडताना पोलिसांना कार्यालयात कळवावं लागतं. ४० आमदार गुजरात गेले थैलीत घेऊन गेले का? असा टोला त्यांनी लगावला. 

त्याचसोबत औरंगाबादचे सगळे आमदार, मंत्री पण गेले. हिंदुत्वाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. काँग्रेसमध्ये त्यांचे जीवन गेले. दुसरे एक आमदार आहेत त्यांना केवळ पैसे पाहिजेत. हिंदुत्व आणि यांचे काही देणे घेणे नाही. पैसे जिथे मिळतील ते तिकडे जातील हे आगामी काळात दिसेल. २०१४ ला मी आमदार झालो, छत्रपती संभाजीनगर असं नाव ठेवण्याआधी पाणी द्या, नोकरी द्या असं सांगितले. केवळ भावनिक मुद्दे काढून निवडणुका लढवल्या गेल्या असा आरोपही जलील यांनी शिवसेनेवर केला. 

वारंवार उद्धव ठाकरेंना खदखद बोलून दाखवली - एकनाथ शिंदेआम्ही शिवसेनेचे ४६ आमदार एकत्र आहोत. शिवसेना पक्षाची विचारधारा हिंदुत्वाची आहे. बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. धर्मवीर आनंद दिघेंच्या सानिध्यात काम करणारे आम्ही आहोत. त्यामुळे हिंदुत्वाची विचारधारा आम्ही पुढे नेतोय. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील हा विचार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. ४६ आमदारांनी जो निर्णय घेतला आहे. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे हिंदुत्व, जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी आम्ही भूमिका घेतली असं विधान शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केले. 

तसेच मिलिंद नार्वेकर यांना चर्चेला पाठवलं. तेव्हा उद्धव ठाकरेंशी फोनवरून बोललो. मी म्हटलं, चर्चा करायला नार्वेकरांना पाठवलं, त्याचवेळी गटनेतेपदावरून काढलं. माझे पुतळे जाळले, मला बदनाम करण्याचं काम केले. एकाचवेळी चर्चा आणि दुसरीकडे आंदोलन, बदनामी असं होत नाही. वेळोवेळी आमदारांच्या मनातील खदखद उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली होती. आपण विचार करून निर्णय घेऊ असं ते बोलत होते. शिवसेना पक्ष ताब्यात घेण्याची मानसिकता नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी ४६ पेक्षा जास्त आमदार आम्ही एकत्र आहोत. संध्याकाळी बैठक झाल्यावर त्यात आमदारांची मते जाणून घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं शिंदेंनी सांगितले. त्याचसोबत नितीन देशमुख यांना स्वत: भेटायला गेलो होतो. आज त्यांना आमचे कार्यकर्ते सोडायला गेले होते असं सांगत अपहरणाचा आरोप फेटाळला 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाइम्तियाज जलील