Join us

BLOG: फक्त एक फोन अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण करेल!

By मोरेश्वर येरम | Published: June 24, 2022 7:37 AM

एकत्र आल्यानं कितपत पाठिंबा मिळतो हे पाहण्यापेक्षा आपल्या पदरातील पूर्वजांची पुण्याई जपणं गरजेचं आहे. मदतीपेक्षा धीर खूप मोलाचा ठरतो.

- मोरेश्वर येरम

"समर्थ रामदास म्हणतात, मारिता मारिता मरावे...मरोनि अवघ्यास मारावे. महाराष्ट्रा हा काही लेच्यापेच्यांचा देश नाहिये...ही वाघाची औलाद आहे आणि या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचे इतिहासामध्ये दाखले आहेत...भविष्यकाळात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. अजून आमचं रक्त भ्रष्ट झालेलं नाही. शिवाजींचं नाव आम्हाला सांगायचं आहे. भवानी आमच्या पाठिशी उभी आहे. काळ बदलला, विचार बदलले, आचार बदलले, ड्रेस बदलले, सगळे बदलले तरी मराठा म्हणून जो मंत्र छत्रपतींनी आम्हाला दिलेला आहे. ती शिवरायांची मुर्ती आमच्या देहातून काढून टाकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही", ही वाक्य आहेत ठाकरे नावाला ज्यांनी ब्रँड बनवलं...महाराष्ट्राचा आवाज बनवलं त्या प्रबोधनकार ठाकरे यांची. 

ठाकरे म्हटलं की धगधगता आवाज. अखंड जनसमुदायाला एकत्र आणण्याची प्रचंड ताकद. प्रबोधनकारांनंतर याच आवाजाला बाळासाहेबांनी शिवसेना नावाच्या ब्रँडमधून जनतेच्या आवाजाचं मूर्तरुप दिलं. जनमानसात शिवसेना ब्रँड इतका रुजवला की नुसतं 'शिवसेना' म्हटलं तरी उमेदवार हमखास निवडून येणार इतकी प्रचंड लोकमान्यता असलेला पक्ष बनला. आज त्याच पक्षाला भगदाड पडतंय...वर्षभर अभ्यास करुन परीक्षेअंती मिळालेली गुणपत्रिका कुणीतरी आपल्याच डोळ्यासमोर उभी फाडावी अशी परिस्थिती शिवसेनेची होताना दिसत आहे. आमदार फुटले तरी पक्ष फुटत नसतो. तो पुन्हा उभा करता येतो. हे सत्य असलं तरी आज बंडखोर आमदार शिवसेना नव्हे, तर 'ठाकरें'च्या भूमिकेला आव्हान देत आहेत. ही बाब गंभीर आहे. 

उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' निवासस्थान सन्मानानं सोडलं असलं तरी आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्यावर असं करण्याची नामुष्की ओढावली हे मान्यच करावं लागेल. त्यात आता आमदारही थेट उद्धव ठाकरे गेल्या अडीच वर्षात कधीच उपलब्ध होऊ शकले नाहीत अशी उघड तक्रार करू लागले आहेत. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखपद सोडण्याची तयारी दाखवूनही आमदार आणि नेते उद्धव ठाकरेंपासून दूर जात आहेत. स्वत:हून शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे घराण्यातील प्रखरता उद्धव ठाकरेंच्या भाषणातून पाहायला मिळात नाही. पण त्यांच्या निर्णयांमध्ये प्रखरता आहे हे नक्कीच विरोधकांनी आजवर अनुभवलं आहे. उद्धव ठाकरेंनी आजवर घेतलेले निर्णय भल्याभल्यांना धक्का देणारे ठरले आहेत. आज एका कट्टर शिवसैनिकानं फारकत घेतलीय. घरातील माणसानंच जर घरफोडी केली तर तक्रार तरी कुणाकडे करायची? अशी काहीशी अवस्था निर्माण झाली आहे. शिवसेना पक्ष ज्या ठाकरे ब्रँडवर उभा राहिला. त्या ठाकरे नावाच्या निखाऱ्यावरील राखेला फुंकर मारुन धग कायम ठेवण्याची वेळ आली आहे. परिणाम काय असतील याचा फार विचार न करता सध्याच्या 'मार्केटिंग बाजी' राजकारणात ठाकरे ब्रँड अबाधित ठेवणं क्रमप्राप्त आहे. शिवसेनेची स्थानिक पातळीवर असलेली मजबूत पकड ही जमेची बाजू असल्यानं उद्धव ठाकरे या ऐतिहासिक बंडानंतरही उभे राहतीलही, पण आज जे प्रश्न निर्माण झालेत ते उद्याही होणार नाहीत याची शाश्वती कोण देणार? 

राजा आणि दादू ही दोन वेगळी नावं असली तरी मूळ 'ठाकरे' आहेत. एकत्र आल्यानं कितपत पाठिंबा मिळतो हे पाहण्यापेक्षा आपल्या पदरातील पूर्वजांची पुण्याई जपणं गरजेचं आहे. मदतीपेक्षा धीर खूप मोलाचा ठरतो. राज आणि उद्धव यांच्या नुसत्या एका संभाषणातून संपूर्ण महाराष्ट्रात काय वातावरण तयार होईल याचा फक्त विचारच राज्यातील मराठी माणसाला नवं स्फूरण देईल. मनसेनं गेल्या १३ वर्षात काय कमावलं याचा विचार करण्यापेक्षा आज शिवसेनेनं खूप गमावलं आहे हे जास्त महत्वाचं नाही का? याचा विचार होणं गरजेचं वाटतं. वास्तविक पातळीवर हे कितपत शक्य आहे याबाबत मतमतांतरं असली तरी अशक्य असं काहीच नाही. कारण आज जे घडतंय तेही काही दिवसांआधी घडेल याची सूतराम कल्पना कुणालाच नव्हती. 'शिवतीर्थ'वरुन 'मातोश्री'वर किंवा 'मातोश्री'वरुन 'शिवतीर्थ'वर फोन खणाणला तर अख्ख्या महाराष्ट्रात नवं वादळ निर्माण होऊ शकतं. यात तिळमात्र शंका नाही. गरज आहे फक्त पुढाकाराची!

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनाराज ठाकरे