मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट उभं राहिले आहे. त्यात आमदारांचे अपहरण करून त्यांना सूरतला नेण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप केला. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांसमोर थरारक अनुभव सांगितला. त्यावरून आता गदारोळ माजलेला असताना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार तानाजी सावंत म्हणाले की, गुप्त मतदान झाल्यानंतर कैलास माझ्याकडे आला, तो म्हणाला नंदनवनला जायचं. आम्ही दोघं एकाच गाडीने एकनाथ शिंदे यांच्या घरी गेलो. चर्चा केली. त्यानंतर आम्ही सूरतच्या दिशेने निघालो. वाहनात तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. गुजरातच्या चेकपोस्टवर आल्यानंतर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्यानंतर मला चर्चा करायची असं बोलला. मी सांगितले आता काय चर्चा करायची तूच सांगितले म्हणून आपण आलो. तेव्हा माघारी जायचं असं बोलला कारण विचारलं तर नाही मला भीती वाटतेय असं तो म्हणाला. मग माघारी जायचं असेल तर माझी गाडी घेऊन जा असं मी बोललो.
मात्र आता माध्यमासमोर कैलास पाटील मीडियाची दिशाभूल करतोय. गन पॉईंटवर त्याला नेलं, असलं काहीही झाले नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची आणि पक्षप्रमुखांशी दिशाभूल करतोय. तुमच्यामुळे शिवसेनेत आहे असं वारंवार माझ्याशी बोलायचा. अडीच वर्ष माझी आणि पक्षप्रमुखांची दिशाभूल केली. मीडियासमोर जे सांगितले त्यातलं काहीही घडलं नाही. भाईंनी कुणालाही फोन केला नाही, कुणावरही दबाव नाही प्रचंड पाऊस पडत असताना ४ किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा आहे. आमदार कैलास पाटील खोटं आणि आभासी कथानक रचून मातोश्रीची आमदार सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी आहे. डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख यांनी देखील सावध राहावं असं आमदार तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
४ किमीचा थरारक पायी प्रवासविधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर डिनरसाठी जायचे सांगून अनेक आमदारांना वेगवेगळ्या वाहनांनी सूरतला नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वाहनातून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे नाट्यमयरित्या गुजरात बॉर्डरहून निसटले. सोमवारी विधानपरिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मात्र, ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही वाहने थांबत नव्हती. काही तासाचा प्रवास झाल्यानंतर चलबिचल सुरु झाल्याने पुढे शिंदे साहेब थांबले आहेत, त्यांना भेटू, असे सांगून वाहने तशीच पुढे नेण्यात आली. ही वाहने महाराष्ट्र-गुजरात सीमेवर थांबविण्यात आली होती.
अंधार अन् भरपावसात बॉर्डरवरुन निसटला शिवसेना आमदार; ४ किमीचा थरारक पायी प्रवास
याचवेळी आमदार कैलास पाटील यांच्या मनात पाल चुकचुकल्याने ते लघुशंकेचा बहाणा करत वाहनाबाहेर आले. यानंतर अंधारात कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. अंधाराचा रस्ता, रिमझिम पावसाच्या कोसळणाऱ्या सरी झेलत कैलास पाटील यांनी पायी प्रवास सुरुच ठेवला. जवळपास ४ किलोमीटर अंतर पावसात भिजत अंधारातून कापले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीवरुन लिफ्ट घेतली. पुढे तो दुचाकीस्वार गाव आल्याने थांबल्यामुळे पुन्हा पायी प्रवास सुरु केला. काही वेळातच एका ट्रकला लिफ्ट मागून त्यांनी दहिसरपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तेथून पुढे आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठला असा दावा कैलास पाटील यांनी केला.