"जनतेला भेटत नाही, आमदारांना वेळ देत नाही ते आता समोर चर्चेला या म्हणतायेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:46 PM2022-06-22T20:46:17+5:302022-06-22T20:47:53+5:30
एकनाथ शिंदे जे बोलले खरेच आहे. मी वाट चुकलो होतो. अडीच वर्ष मी हिंदुत्वाची बाजू घेतली नाही हे तुम्हाला घोषित करावं लागेल असा टोला भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन करत समोर या, चर्चा करा, मी जर मुख्यमंत्री नको तर सांगा, मी राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र यात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ही अनैसर्गिक आघाडी आहे हे खरे आहे. खुर्चीचे प्रेम जागे झाले आणि उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले. या ढोंगी सरकारला जागा दाखवणं गरजेचे होते. तुम्ही जनतेसमोर गेला नाही. मंत्रालयात मुख्यमंत्री जातात अशी बातमी होते. त्याला जनतेचे प्रेम म्हणायचं? व्हिडीओ संवाद जनतेशी करता मग आमदारांशी करा. त्यांनी समोर यावं हे सांगणे म्हणजे आश्चर्य आहे. मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारलीच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला भेटत नाही, मंत्रालयात जात नाही. आमदारांना भेटत नाही. फोनवरून संवाद साधता मग यांना प्रत्यक्षात भेटायला बोलवता तुम्ही फोनवर बोलू शकता असं त्यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे जे बोलले खरेच आहे. मी वाट चुकलो होतो. अडीच वर्ष मी हिंदुत्वाची बाजू घेतली नाही हे तुम्हाला घोषित करावं लागेल. हिंदुत्वाची बाजू घेत आहेत मग MIM तुमचं कौतुक कसं करतंय? शब्दात हिंदुत्व पण कृतीत नाही. २४ ऑक्टोबर २०१९ ची पत्रकार परिषद आठवता. तुम्ही काँग्रेसला कसे भेटला. जयपूरला काँग्रेसचे आमदार गेले. सोनिया गांधी यांच्यासमोर झुकलेला फोटो पाहिला हे लोकांनी पाहिले. झुकला. आम्ही ९५ मध्ये युती सरकार असताना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भाजपा आमदार गेलो होतो. तेव्हा एकवीरा मातेसमोर जात काँग्रेससोबत कधी जाणार नाही अशी शपथ घेतली होती. मग एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची बाजू घेतली ती चुकीची कशी? तुम्ही त्यांची बाजू घ्यायला हवी. तुम्ही कमलनाथ, शरद पवार यांचा विश्वास व्यक्त करता. ज्यांनी शिवसेनेला त्रास दिला त्यांच्याबद्दल हर्ष व्यक्त करतात असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तसेच ही नैसर्गिक क्रिया आहे. हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले तरी काँग्रेससोबत सत्तेत बसला. ज्या बाळासाहेबांना छगन भुजबळांनी अटक केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसला असंही भाजपाने म्हटलं.