Join us

"आता गाठ माझ्याशी, हिंमत असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 3:07 PM

अडीच वर्षात यांनी हिंदुत्वाचा चकार शब्द ही काढला नव्हता. मी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरे, शिरसाट, मराठवाड्यासाठी दिलाय मला आश्चर्य वाटतं असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - प्रत्येक आमदाराचे मान पकडून, हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरपटत नेले असे व्हिडिओ आहेत. यांच्यासाठी काय कमी केलं? त्यांना स्वतःला आरशात बघायलाही लाज वाटेल अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. अतिशय साधे संजय पवार यांना पाडायचं काम फुटीरतावादी आमदारांनी केलं. साहेब तुम्ही जास्त विश्वास टाकला असं म्हणतात तेव्हा उद्धवजी म्हणतात शिवसैनिकवर विश्वास नाही टाकायचा तर कोणावर टाकायचा. पहिलं बंड सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जात आहेत. प्रत्येक आमदार तिथे गेला तरी विजय शिवसेनेचाच होणार असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिला आहे. 

सांताक्रुझ येथील मेळाव्यात आदित्य ठाकरे म्हणाले की, उद्धवजींनी मोह सोडलाय, जिद्द, ताकद नाही. आम्हीच शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात. तुमची लायकी असती तर सुरतमध्ये पळाला असता?बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केलं असतं. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. एकाने विचारलं आदित्यजी कसं वाटतंय मी म्हटलं, लोकांचं प्रेम दिसतंय. पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कुठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असा टोला त्यांनी लगावला. 

त्याचसोबत २० मे रोजी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? पण जे झालं ते झालंच. बंडखोरांना माफी नाही. महत्वाची खाती होती, पक्षात वजन होतं इथे मानसन्मान मिळत होता. स्वतः विकलेलो नाही विकणारही नाही. ज्यांना जायचंय दरवाजे खुले आहेत. काय होते तुम्ही आणि काय जोक झालाय तुमचा. जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारायला जाता? संरक्षण काश्मिरी पंडितांना द्यायला हवी ती कुठे वापरली जातेय. चार्टर्ड प्लेन, हॉटेलचा खर्च किती असेल, अपहरण केलेल्या आमदारांना कपडे देण्याचं बिल किती असेल. G20 मध्ये जेव्हा आपल्या देशात लोक येणार तेव्हा त्यांना वाटेल इथे लोकशाही आहे की नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर केला. 

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना यांच्यामुळे मी निवडून आलोय. हिंमत असेल तर निवडणूक लढा प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही गाठ माझ्याशी आहे. ठोकरे आडनाव करा असं एक जण म्हणाला ठोकरे पेक्षा ठाकरे पॉवरफुल आहे. बंडखोरांना आव्हान माझ्यासमोर येऊन बसा डोळ्यात डोळे घालून बघा सांगा काय कमी केलं. १५ वर्षात किती फंड मिळायचा आणि आता किती मिळतोय सांगा. आपण जनतेसाठी हा पैसा देतो स्वतःला विकायला नाही. २-४ लोकांनी सांगितलं आम्ही लाचार झालो तुमचेच आहोत. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिकडे गेला. दिलीप मामा लांडे परवा हातात हात घालून रडलेला माणूस कसा जाऊ शकतो. संदीपान भुमरे कसे आमदार, मंत्री झाले माहितीये का? अडीच वर्षात यांनी हिंदुत्वाचा चकार शब्द ही काढला नव्हता. मी जास्तीत जास्त फंड संदीपान भुमरे, शिरसाट, मराठवाड्यासाठी दिलाय मला आश्चर्य वाटतं. आज राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे या आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. धनुष्यबाण आपलाच राहणार असून प्रहार किंवा भाजपामध्ये विलीन होणे हाच त्यांच्यासमोर पर्याय आहे स्वतःचं अस्तित्व संपणार असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना