लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अलिकडेच जोरदार टीकास्त्र सोडणारे माजी मंत्री व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सध्या वादळ निर्माण केले आहे. विधानभवनात त्यांची एंट्री शुक्रवारी अशीच वादळी झाली.
विधानभवनात यायचे तर कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे. तेही ४८ तास आधी चाचणी केलेली असणे सक्तीचे करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून कुणालाही अपवाद केलेले नाही. रामदास कदम विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आले तेव्हा सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे कोरोना चाचणीचा अहवाल मागितला. तो त्यांच्याकडे नसल्याने आत जाता येणार नाही, असे त्याने बजावले. कदम यांनी सुरक्षारक्षकास समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना रोखण्यात आले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती देण्यात आली. ते लगेच प्रवेशद्वारावर आले. रामदासभाईंकडे कोरोना अहवाल नसला तरी त्यांची तातडीने अँटिजेन टेस्ट करून घ्यावी व त्यांना आत जाऊ द्यावे, असा उपाय काढण्यात आला. त्यानुसार कदम यांची अँटिजेन टेस्ट करून त्यांना आत जाऊ देण्यात आले. रामदास कदम आणि अनिल परब या शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वितुष्ट असल्याची चर्चा आहे. त्यातूनच कदम यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे.
खेडेकर सरकारचे जावई आहेत का : कदम
- खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुरुवारी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला.
- जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेसंदर्भातील अहवाल दिला असतानाही खेडेकर यांना पाठीशी घातले जात आहे.
- त्यामागे कोणता नेता आहे, कोणता पक्ष आहे, याची मला कल्पना आहे. याविषयी न्यायालयात धाव घेणार असल्याचे रामदास कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले.