मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:39 AM2022-10-03T05:39:28+5:302022-10-03T05:40:07+5:30

उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

eknath shinde said i am not afraid after threats to kill chief minister security system on alert | मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे. शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. याशिवाय महिनाभरापूर्वी शिंदे यांना मारण्याची धमकी देणारे पत्र मंत्रालयात आले होते, तर धमकीचा एक निनावी फोनही आला होता. यापूर्वी मागील सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना वारंवार येणाऱ्या धमक्यांचा स्रोत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी शोधावा असे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तवार्ता विभागाला 
दिले आहेत. पीएफआयविरोधात महाराष्ट्रात झालेल्या कारवाईचा या धमकी प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपासही पोलीस करणार आहेत.

ठाण्यातील निवासस्थानी सतर्कता   

ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. तेथे योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली. या संपूर्ण परिसराचा आढावा घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वीच त्यांना अति उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. ‘मातोश्री’च्या धर्तीवर ठाण्यातील शुभदीप या सोसायटीतील शिंदे यांच्या निवासस्थानालाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या सोसायटीच्या बाहेर बॅरिकेड्स उभारून तेथे ये-जा करणाऱ्यांची चौकशी आणि तपासणीही केली जात आहे. 

फोन केला किंमत जास्त लावल्याच्या रागातून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याचा प्लॅन चालू असल्याची बतावणी

पुणे : कॉल सेंटरमधील एका तरुणाने पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या रागातून मॅनेजरला त्रास देण्यासाठी दारूच्या नशेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे ठार मारण्याचा प्लॅन चालू असल्याचा कॉल १०० नंबरला केल्याचे उघड झाले आहे. 

अविनाश आप्पा वाघमारे (वय ३६, रा. रमाबाई आंबेडकरनगर, घाटकोपर) याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी कलम १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणावळ्यातील हाॅटेल साईकृपा येथे घडला. दारूच्या नशेत वाघमारे याचा मॅनेजर किशोर पाटील यांच्याशी पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याने वाद झाला. नंतर मॅनेजरला त्रास देण्यासाठी उद्देशाने त्याने १०० क्रमांकाला कॉल केला. 

नक्षलवाद्यांनी दिली होती धमकी

शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांनी त्यावेळी त्यांना पत्राद्वारे धमकी दिली होती. तेव्हापासूनच शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

पोलिसांवर ताण वाढणार

-  दसरा मेळावा तोंडावर आला असताना हा धमकीचा प्रकार समोर आल्याने पोलिसांवरील ताण वाढणार आहे. 

- मुंबईत यंदा शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू आहे.

- शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीत होणार असून त्याला एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांना अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

फोन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

अविनाश वाघमारेने साईकृपामध्ये काही लोक बसले असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा प्लॅन करीत आहेत, असे खोटे सांगितले. मुंबई-बंगळुरू रोडवरील खेड शिवापूर येथे ट्रॅव्हल थांबवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा

धमक्यांना मी घाबरत नाही. मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला धमक्या आल्या होत्या. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नाही. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. धमक्या देऊन जनतेत जाण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. या प्रकरणात गृहविभाग आणि पोलीस काम करत आहेत. याआधीदेखील नक्षलवाद्यांच्या धमक्या आल्या आहेत. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: eknath shinde said i am not afraid after threats to kill chief minister security system on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.