Join us

Eknath Shinde: 'ती' महाशक्ती कोणती ते एकनाथ शिंदेंनी अखेर स्पष्टपणे सांगितलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 9:37 AM

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी महत्वाचं विधान केलं आहे. आम्हाला जे बहुमत हवं होतं ते आज आमच्यासोबत आहे.

मुंबई-

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी महत्वाचं विधान केलं आहे. आम्हाला जे बहुमत हवं होतं ते आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. यात महत्वाचे निर्णय घेतले जातील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच एकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना संबोधित करत असतानाचा एक व्हिडिओ काल समोर आला होता. यात त्यांनी एक महाशक्ती आपल्या पाठिशी आहे असं विधान केलं होतं. ही महाशक्ती नेमकी कोणती? असं विचारण्यात आलं असता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची महाशक्ती आमच्या पाठिशी आहे. त्यांचे आशीवार्द आमच्या पाठिशी आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी फोनवरुन साधलेल्या संवादात बोलत होते. 

"आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय घेतले जातील. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकारच अल्पमतात असलेल्या गटाला नाही. अल्पमतात असलेल्यानं असा निर्णय घेता येत नाही. बैठकीला अनुपस्थित राहिलो नाही म्हणून आमदारी रद्द केली तर देशातील हे पहिलं उदाहरण ठरेल. कायद्यानुसार सर्व गोष्टी चालत असतात. लोकशाहीत आकडे आणि संख्याबळाला महत्व असतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

शरद पवारांनी केलेल्या विधानाला दिलं उत्तरराज्याबाहेर गेलेल्या आमदारांना कधी ना कधी मुंबईत यावच लागेल. राज्यपालांची भेट घेऊन आणि विधान सभेत येऊन बहुमत चाचणीला त्यांना सामोरं जावच लागेल. त्यामुळे त्यांना इथं येऊ द्यात, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. "शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचा आम्ही आदरच करतो. पण लोकशाहीत नंबर महत्वाचे असतात कायद्याप्रमाणे जे काही असतं तेच करावं लागतं. नियमाप्रमाणे आमची बाजू जी आहे ती भक्कम आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेशरद पवारउद्धव ठाकरेशिवसेना