मुंबई-
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव तसंच धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. पण येत्या काळात धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असल्याचा ठाम दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात आयोजित विशेष महामुलाखतीत बोलत होते. यावेळी शिंदे यांनी धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळण्यामागचं गणित समजावून सांगितलं.
"आम्हाला निवडणूक चिन्हाबाबत कुणाला काहीच सांगण्याची गरज नाही. मेरिटच्या जोरावर ते आम्हालाच मिळेल. अंधेरीची पोटनिवडणूक लागली म्हणून निवडणूक आयोगाला निर्णय घेता आला नाही. पण आगामी काळात धनुष्यबाण आम्हालाच मिळेल. याचं कारण म्हणजे ५५ पैकी ४० आमदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मतांची आकडेवारी ३९ लाख इतकी आहे. तसंच १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी ६९ लाख इतकी आहे. म्हणजेच पक्षाला पडलेल्या एकूण मतांपैकी ७० टक्क्यांहून अधिक मतं आमच्याबाजूनं आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकशाहीत बहुमताला मान असतो. धनुष्यबाण चिन्ह यानुसार आम्हालाच दिलं जाईल आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचा सन्मान होईल", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
मतदार म्हणून आम्हाला किंमत नाही का?, नानांनी पहिल्याच प्रश्नात बॉम्ब टाकला; CM शिंदे म्हणाले...
चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला ठाकरेच जबाबदार"मेरिटच्या जोरावर धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा विश्वास आम्हाला आहे. मी कालपासून बघतोय आमच्यावर अन्याय झाला असा गळा काढला जात आहे. धनुष्यबाण गोठवण्याच्या निर्णयाला आम्हाला जबाबदार धरलं जात आहे. पण खरंतर तेच लोक या निर्णयाला जबाबदार आहेत. कारण निवडणूक आयोगानं वारंवार संधी दिली. कागदपत्र मागितली पण त्यांनी वेळकाढूपणा केला. चार वेळा वेळ वाढवून मागितली. मला कालच समजलं की जी शपथपत्र दिली गेली ती बोगस असल्याचं आढळून आलं आहे. पोलिसांनी तशी कारवाई केली आहे. वेळकाढूपणा केल्यामुळेच चिन्ह गोठवण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली", असं एकनाथ शिंदे म्हणाले.