मुंबई - राज्यसभा निवडणुकी पाठापोठ विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपाने पराभव केला. भाजपाचे पाच पैकी पाचही उमेदवार विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेतील बंडाळीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेकांना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण झाली. तर, खुद्द शरद पवार यांनीही आमच्याकडेही असे बंड झाल्याची आठवण पत्रकार परिषदेत केली. त्यातच, आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही दिवसांपूर्वी गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातमधील सुरतच्या हॉटेलात शिवसेनेचे सुमारे ४० आमदार आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे सध्याचा राजकीय गोंधळात अजित पवार नक्की कुठे आहेत, अशीही चर्चा रंगली. मात्र, सध्याच्या राजकीय गोंधळात अजित पवार मंत्रालयातील कार्यालयात बैठका घेताना दिसून आले. पण, शिवेसनेतील हे बंड होण्यापूर्वी काही दिवस अगोदर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात भेट झाली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद निवडणुकीच्या काळात रात्री उशिरा गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? हे कळाले नाही. मात्र, अशी भेट झाल्याची माहिती जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळाली त्यावेळी दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले होते. त्यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदान शेवटच्या क्षणी मतदान स्थळावर पोहोचले होते.
राष्ट्रवादीत तेव्हा काय घडलं
२०१९ साली महाविकास आघाडी स्थापन होत असल्याच्या प्रक्रिये दरम्यान राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवार बंडखोरी करून भाजपासोबत गेले होते. भाजपाने अजित पवार गटासोबत शपथग्रहण करून सत्तास्थापना केली होती. पण दीड दिवसांत ते सरकार पडले होते. आता एकनाथ शिंदे यांनी काहीशा तशाच पद्धतीचे बंड केले आहे.