Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत भलताच पेच! मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेता शिवसेनेचाच; नव्या वादाची चिन्हे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 11:37 AM2022-08-17T11:37:47+5:302022-08-17T11:39:11+5:30
Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचेच अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही गट एकमेकांना शह देण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच आता विधान परिषदेत वेगळाच पेच समोर आल्याचे दिसत आहे. कारण, वरिष्ठ सभागृहात मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता शिवसेनेचाच असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली असली तरी त्यावरुनही वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून ते मुख्यमंत्रीपदी आहेत. अशा वेळी विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेलाच कसे देता येईल, असा कायदेशीर व तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.
दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता
भाजप आणि शिंदे गटाकडून दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त असून त्या जागी कोणाची निवड करायची, याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे. विधान परिषदेतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींचा समावेश आहे.
दरम्यान, बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे. दरेकर हे फडणवीस यांच्या विश्वासातील असून त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे राम शिंदे किंवा प्रवीण दरेकर यांच्यापैकी एकाची विधान परिषद सभापतीपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांवर नियुक्ती झाल्याशिवाय सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार नाही. कारण १२ सदस्यांची भर पडली तरच भाजपला सभापतीपद मिळू शकते. विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य असले तरी त्यापैकी तीन-चार सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.