मुंबई - मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2 दिवसांपासून आमदारांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा धडाकाच लावला आहे. राजधानी मुंबईच्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी जल्लोषात भाषण केले. यावेळी, गुवाहाटीतील अनेक किस्से आणि मनोरंजक प्रवास त्यांनी उलगडला. यावेळी, सांगोल्याचे आमदार शहाजाबापू पाटील यांच्या डायलॉगचा ओक्के संवादही केला.
आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीतील घडलेल्या प्रसंगांची आठवण करुन दिली. गुवाहाटीत आम्ही सगळे आमदार मजेत होतो. इथे बसलेत त्यांना विचारा, आमचं सगळं ओक्केमधीच होतं. शहाजीबापू एवढा ओक्के आहे ते आम्हाला माहितीच नव्हतं. शहाजीबापूंच्या कलागुणांना गुवाहाटीत वाव मिळाला. सोशल मीडियात, मीडियात ते सगळे फेमस झाले, टी शर्ट निघाले, गाणं आलं. गुवाहाटीच्या टुरिझमचा प्रचार झाला, तिकडचे मुख्यमंत्री, मंत्री म्हणाले याला आपण इकडे पर्यटनमंत्री बनवुया... अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यावेळी, समोरच्या लोकांनीही हसून दाद दिली.