Join us  

Eknath Shinde: शरद पवारांची भेट? फोटो व्हायरल, माध्यमांत चर्चा, अखेर मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले तो फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 12:06 PM

Eknath Shinde: राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. तसेच या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. तसेच या भेटीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून आज सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ही बातमी चुकीची असून, त्यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 

मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मी भेटल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे. ही बातमी संपूर्णपणे चुकीची असून, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातमीसोबत व्हायरल झालेला फोटो हा मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्यात अद्याप अशी कोणतीही भेट झालेली नसून, याबाबत आलेल्या कोणत्याही बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये.

नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यासंदर्भातील काही फोटो व्हायरल झाले. अचानक  भेटीचे वृत्त आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आलेले सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत प्रस्ताव जिंकल्यानंतर शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल, असा दावा केला होता. शरद पवार यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही तशीच विधाने केली आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुख्यमंत्रीशरद पवारमहाराष्ट्र