Join us  

Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC: "याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही...", राष्ट्रवादीची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 5:28 PM

शिंदे यांच्या बीकेसी मधील सभेला लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

Eknath Shinde Shivsena Dasara Melava at BKC: शिवसेनेत फुट पडल्यानंतर आज मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानही सज्ज झालं आहे. दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार यात दुमतच नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीची स्पर्धा दोन्ही गटाकडून सुरू झाली आहे. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमते हे मुख्य सभेच्या वेळी कळेलच. पण या गर्दीवरून राष्ट्रवादीने शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळावा सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेनेचे नवे-जुने पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. बीकेसीचे मैदान पूर्णपणे भरून जाईल असा जनसमुदाय शिंदे गटाला अपेक्षित आहे. पण याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सभेला उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमधून लोकांना बळजबरी आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केली आहे. "यूपी, बिहार, बंगाल या परराज्याच्या कामगारांना बसमध्ये डांबून बीकेसीच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यास घेऊन जाणे याच्यापेक्षा मोठी वैचारिक दारिद्रता असू शकत नाही...", असे ट्वीट तपासे यांनी केले आहेत.

दरम्यान, राजकीय पटलावर आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील दादर, सीएसएमटी स्टेशनवर राज्यभरातून बसेस, वाहने आणि रेल्वे येऊ लागल्या आहेत. सीएसएमटीवर काही वेळापूर्वी २४ डब्यांच्या दोन ट्रेन दाखल झाल्या. यातून दोन्ही गटाचे सुमारे ५००० कार्यकर्ते बाहेर पडले. दोन्ही गटांचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात होणार असल्याने त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शिंदे गटाने आपल्या कार्यकर्त्यांना थेट पायी बीकेसीतील मैदान गाठण्यास लावले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील पायीच दादरच्या शिवाजीपार्ककडे रवाना झाले आहेत.

टॅग्स :दसराएकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई