Bharat Gogavale on Ajit Pawar joins Shinde Fadnavis Government: प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानुसार जर राष्ट्रवादीचे लोक गेल्या वर्षीच सत्तेत येणार होते असं म्हणत असतील तर जे राष्ट्रवादीच्या लोकांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. आता शपथविधी झाला. आता नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती जी आहे ती स्वीकारायलाच हवी. प्रत्येक जण थोडा तरी नाराज होणार. कारण ज्यांना एक भाकरी मिळणार होती, त्यांना अर्धी भाकरी खावी लागणार. ज्यांना अर्धी मिळणार होती त्यांना पाव भाकरी मिळणार आहे. त्यामुळे सध्या जे आहे त्यात आम्ही समाधानी आहोत, काळजीचे काहीही कारण नाही, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी आणि विशेषत: अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, प्रतिस्पर्धी आमदारांना बळ देतात अशी भूमिका मांडून गेल्या वर्षी शिंदे गट मविआच्या सरकारमधून बाहेर पडला. पण आता शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांच्या सोबत सत्तेत पुन्हा बसावे लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील बरेचसे आमदार नाराज आहेत, अशी चर्चा शपथविधीपासूनच जोर धरू लागली होती. त्यावर अखेर आज शिंदे गटाकडून स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले.
नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना नव्या सरकारमध्ये विविध खाती मिळतील अशी चर्चा रंगली आहे. त्यावरही भरत गोगावले यांनी भाष्य केले. "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देशहितासाठी आणि महाराष्ट्रहितासाठी जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाला सहकार्य करणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. आता कुणाला कुठली खाती द्यायची ते तेच लोक ठरवतील. पुढच्या आठ दिवसात पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल असा आम्हाला अंदाज आहे. आताच्या मंत्रिमंडळात मी नक्कीच असेन," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.