मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याचदरम्यान, गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.
शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज बैठक-
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी १२ वाजत बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार हजेरी लावणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.