मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कांदिवली भागात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना दे धक्का दिला आहे. कांदिवली चारकोप भागातील माजी नगरसेविका संध्या दोशी या मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेणार आहेत. संध्या दोशी या मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण समिती अध्यक्षा आहेत. गेल्या ३ टर्मपासून त्या चारकोप वार्ड १८ च्या नगरसेविका आहेत.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करण्यापूर्वी संध्या दोशी म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात मुंबई महापालिकेवर जे प्रेम केलंय, त्यांनी जी कामे केली आहेत त्या कामाने प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. आज सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. या कामाबद्दल मला एकनाथ शिंदेंचा अभिमान वाटतो. त्यामुळे मी आज हा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मला कुठलेही आश्वासन देण्यात आलं नाही. पक्षाचे प्रमुख जी काही जबाबदारी देतील ते मला मान्य असेल. मी २००७, २०१२ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होती. मला सरकारमध्ये राहून काम करायचे होते तेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकदा प्रभाग समिती अध्यक्ष बनवलं होते. २ वर्ष मला शिक्षण समितीचं अध्यक्षपद दिले होते. मला त्यांच्याबद्दल काहीही रागरुसवा नाही. फक्त शिंदे सरकारने जे अडीचवर्ष काम केले आहे. रस्त्यांची कामे बघतायेत. लाडकी बहिण ही योजना आणली. मी जवळपास साडे चार हजार महिलांचे अर्ज भरून त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे आलेले आहेत. त्यामुळेच मी आज शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहे असं संध्या दोशी यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून माझा पक्षप्रवेश होतोय, माझे सहकारी २ माजी शाखाप्रमुख, २ कार्यालयप्रमुख ७ उपशाखाप्रमुख, ४ महिला उपसंघटक आणि असंख्य चारकोप, गोराई येथील कार्यकर्ते ४५-५० बसेसने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी विधानसभेत जो कुणी युतीचा उमेदवार असेल त्यांचा काम आम्ही करू असा विश्वास माजी नगरसेविका संध्या दोशी यांनी दाखवला.