Shivsena: "शिवसेनेविरुद्ध 'काँन्ट्रॅक्ट किलर'प्रमाणे वापर, शिंदेंनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 08:10 AM2022-10-16T08:10:15+5:302022-10-16T08:10:44+5:30
मुख्यमंत्रीपद म्हणजे प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे, पतवंडे जन्माला येतात. त्यांचे आशीर्वाद खऱ्या शिवसेनेलाच असतील
मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नातून उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातील दरी अधिकच वाढली आहे. धनुष्यबाण हे चिन्हा तात्पुरते गोठवण्यात आल्याने ठाकरेंनी संताप व्यक्त करत रोखठोक मत मांडलं असून ही शिंदेंच्या अध:पतनाची सुरूवात असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात 'कॉण्ट्रक्ट किलर'प्रमाणे होत आहे. 'शिंदे' नामाचा महाराष्ट्रातील इतिहास शौर्याचा व इमानाचा आहे, पण सध्याचे शिंदे हे महाराष्ट्राचे खलपुरुष ठरत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंवर शिवसेनेनं बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्रीपद म्हणजे प्रतिष्ठा नाही. महाराष्ट्रात रोज अनेक नातवंडे, पतवंडे जन्माला येतात. त्यांचे आशीर्वाद खऱ्या शिवसेनेलाच असतील. शिंदे यांनी कुठेतरी स्वतःला ब्रेक लावायला हवा, असा इशाराही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरासाठी जळजळीत लेख लिहिण्यात आला असून त्यामध्ये एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यासह ५ बंगल्यांवर ताबा घेतला आहे. तर, आठवड्यातून एकदाच म्हणजे कॅबिनेट बैठकीलाच मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयात जातात, असेही शिवसेनेनं रोखठोक भूमिका मांडताना सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा ५ सरकारी बंगल्यांवर ताबा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' या अधिकृत निवासस्थानासह एकूण पाच सरकारी बंगले ताब्यात घेतले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी 'नंदनवन' बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले एकत्र करून त्यांनी 'नंदनवन' बंगल्याचा विस्तार केला. मुख्यमंत्री म्हणून 'नंदनवन'मध्येच राहीन असे त्यांनी जाहीर केले, पण आता त्यांनी 'नंदनवन'वर ताबा ठेवून 'वर्षा'वर मुक्काम हलवला. आता कार पार्किंग आणि भेटायला येणाऱ्यांची गर्दी या सबबीखाली 'अग्रदूत' व 'तोरणा' हे बंगले ताब्यात घेतले. त्याहीपुढे ते गेले व पक्ष कार्यालयास जागा हवी म्हणून मंत्रालयासमोरील 'ब्रह्मगिरी' बंगल्याचाही ताबा घेतला. मुख्यमंत्रीपदावरील 'निःस्वार्थी व्यक्ती' एकाच वेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे.
धमकीमागे मोठा विनोद निघाला
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात आपले हिंमतबाज मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आला. त्यावर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. गृहमंत्री फडणवीस यांनी 'झेड प्लस'च्या वरची सुरक्षा मुख्यमंत्र्यांना दिली. देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे प्रवीण दरेकर यांनी जाहीर केले. ''कितीही धमक्या येऊ द्यात, मी जनसेवा सुरूच ठेवणार'' असे मुख्यमंत्री म्हणाले, पण या धमकीमागचे सत्य म्हणजे मोठाच विनोद निघाला. कॉल सेंटरमधील एका तरुणाने पाण्याच्या बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या रागातून दारूच्या नशेत हॉटेल मॅनेजरला त्रास देण्यासाठी ''मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन चालू आहे'' असा कॉल '100' नंबरवर केल्याचे नंतर उघड झाले, पण भाजपवाल्यांनी प्रकरण देशविघातक प्रवृत्तीपर्यंत नेऊन ठेवले.
मुख्यमंत्री आठवड्यातून एकदाच मंत्रालयात जातात
उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नाहीत, असा शिंदे व फडणवीस यांचा आक्षेप होता, पण मुख्यमंत्री शिंदे हे फक्त आठ दिवसांतून एकदाच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात जातात हे आता समोर आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय त्यांच्या टोळीचे आमदारच चालवितात. मुख्यमंत्री म्हणून मी जनतेची सेवा करतोय, असे श्री. शिंदे वारंवार सांगतात. शिंदे कोणती सेवा करतात ते आता स्पष्ट झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देऊन आपल्या गटात आणणे हीच त्यांची जनसेवा.
ही शिंदेंच्या अध:पतनाची सुरूवात
शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा 'लाभ' झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर 'कॉण्ट्रक्ट किलर'प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंदे हे नेते नसून 'कॉण्ट्रक्ट किलर'च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा ''माझीच शिवसेना खरी'' व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे. माझ्या नातवाचा जन्म झाला व उद्धव ठाकरे यांचे अधःपतन सुरू झाले, असे ते बीकेसी मेळाव्यात म्हणाले ते खरे नाही. शिवसेना फोडल्यानंतर शिंदे हे खलनायक ठरले व लोक त्यांचा तिरस्कार (Hate) करीत आहेत. हे कोणाचे अधःपतन? मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय.