एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 09:05 AM2022-10-02T09:05:08+5:302022-10-02T09:06:46+5:30

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे.

Eknath Shinde stabbed Anand Dighe in the back, much to Shiv Sena's dismay on Dassara melava | एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेनं सांगितला तो किस्सा

googlenewsNext

मुंबई - राज्यातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. मात्र, हा बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता, शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना राज्यात रंगला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर आता कायदेशीरपणे शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याची तयारी सुरु केली आहे. तर, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावाही आमचाच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेऊन सध्या शिंदे गटाचं राजकारण सुरू आहे. आता, शिवसेनेनं रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सगळेच आनंद दिघे नसतात, काहीजण शिंदे असतात. शिंदेंनी आनंद दिघेंच्या पाठित खंजीर खुपसला, असे म्हणत धर्मवीर सिनेमाचा किस्साही रोखठोकपणे सांगितला आहे.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. तर, शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हाच परंपरेचा आणि खऱ्या शिवसेनेचा असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे आनंद दिघे यांच्या नावाने शिंदे गट हिंदुत्त्वाचा वसा जपत आम्हीच हा वारसा पुढे नेत असल्याचं सांगतोय. त्यामुळे, शिवसेनेनं आता आनंद दिघे कोण होते हेच रोखठोकपणे सांगितलं आहे. रोखठोकच्या सदरातून शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच 'दिघे' होता येत नाही. काही जण 'शिंदे' होतात… दिघे नक्की कोण होते? त्यावर प्रकाशझोत टाकणारे खळबळजनक रोखठोक, असे म्हणत सामनाच्या रोखठोकमधून शिंदेंना टोला लगावण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून 'धर्मवीर' सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली!

हे डोकं शिंदेंच नाही, भाजपचं कारस्थान

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. 

शिंदेंनी चित्रपटात चुकीचे दिघे दाखले

एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते. त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती. त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती. त्यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यपद्धतीवर अनेकदा छापून आले, पण दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय, ती चुकीची आहे. अनेक वर्षे ठाण्यातील राजकारण हे आनंद दिघे व वसंत डावखरे या जोडगोळीच्या युतीने केले. दोघांचे संगनमत व मैत्री होती. डावखरे काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादीचे झाले. भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत. आता दिघे किती भाजपप्रेमी होते त्याचा एक प्रसंग सांगतात. कदाचित शिंदे व त्यांच्या 40 आमदारांना तो माहीत नसावा. 1992 साली अयोध्येत बाबरी पडली. भाजपने जबाबदारी झटकली. बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समस्त देशाचे हिंदुहृदयसम्राट बनले. देशात हिंदुत्वाची तुफान लाट त्यातून आली व शिवसेनाप्रमुख त्या लाटेचे नेतृत्व करू लागले. उत्तर प्रदेशात कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त केल्याने कल्याण सिंगांच्या कपाळावर हौतात्म्याचा टिळा लागला होता. तेव्हा ठाणे हा कल्याण-डोंबिवलीसह एकच लोकसभा मतदारसंघ होता व भाजपचे राम कापसे हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्याआधी कापसे हे कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत. तर या कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना सभेस बोलावून त्यांचा वीरोचित सत्कार करण्याचे ठरवले. ही सभा म्हणजे ठाण्यातील शिवसेनेस अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा पहिला प्रयोग होता. आनंद दिघे यांना हे पटले नाही. त्यांनी सभेत मोडता घातला नाही, पण संध्याकाळी ते सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून सभा ऐकायला गेले. त्यांचे खास लोक गाडीत बसले होते. सभा सुरू होताच खासदार राम कापसे भाषणास उभे राहिले. भाषणात त्यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा करताच दिघे अस्वस्थ झाले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला. ''अरे, कापसे हे काय बोलताहेत? हिंदुहृदयसम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे आहेत. भाजप नवे हिंदुहृदयसम्राट का निर्माण करतोय? हे शिवसेनेला आव्हान आहे. ठाण्यात तरी मी चालू देणार नाही. मी आता सांगतो, इकडची दुनिया तिकडे होईल, पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल!'' आनंद दिघे त्या गाडीतच जाहीर करून बसले. ही खदखद त्यांनी मनातच ठेवली, पण लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटपात ठाण्याचा विषय येताच दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगितला. ठाण्यात भाजप चालणार नाही. दिघे बाळासाहेबांना भेटले व त्यांनी आग्रह केला. ''राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत. शिवसेनाप्रेमी जनता त्यांचा पराभव करेल. ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल.'' शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दिघे ठाम होते. अखेर त्यांच्या हट्टापुढे सगळय़ांना मागे हटावे लागले. कापसे यांना मागे ठेवून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला व महापौर निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले. भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनाद्वेषाला आव्हान देणाऱया दिघ्यांचे हे खरे रूप होते, पण शिंदेनिर्मित चित्रपटात ते कोठेच दिसले नाही!
 

Web Title: Eknath Shinde stabbed Anand Dighe in the back, much to Shiv Sena's dismay on Dassara melava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.