Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन

By मनोहर कुंभेजकर | Published: March 12, 2023 11:47 AM2023-03-12T11:47:33+5:302023-03-12T11:48:30+5:30

सुमारे अर्धा तास श्रीकृष्ण नगर नदी पूल ते आमदार सुर्वे संपर्क कार्यालयापर्यंत विराट आशिर्वाद यात्रा काढण्यात आली.

Eknath Shinde: Stormy crowd at Eknath Shinde's meeting; MLA Prakash Surve's show of strength in Magathana shivsena | Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या सभेला तुफान गर्दी; मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व उत्तर मुंबईचे संपर्कप्रमुख यांनी मांडलेल्या येथील समस्या सोडवण्यासाठी  निधीची कदापी कमतरता भासणार नाही.आणि या समस्या लवकर  सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ठाम ग्वाही काल रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशोकवन येथील संपर्क कार्यालयासमोर झालेल्या विराट जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

कांदिवली पूर्व, समता नगर येथे पश्चिम दुर्तगती महामार्गावर पादचारी(स्कायवॉक) पूलाचा भूमिपूजन सोहळा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर/मध्य विभाग हद्दीत, बोरिवली स्थित श्रीकृष्ण नगरात, पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून दहिसर नदीवर पुनर्बांधणी होत असलेल्या वाहतूक पूलाचा पहिला टप्पा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते काल सायंकाळी समारंभपूर्वक खुला करण्यात आला.

या पूलासाठी आमदार सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांकडे चार वेळा या संदर्भात बैठक आयोजित केली होती.

यावेळी स्थानिक खासदार  गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार  प्रकाश सुर्वे, भाजप विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, युवासेना कार्यकरणी सदस्य राज प्रकाश सुर्वे, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. श्रीमती भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पूल) संजय कौंडिण्यपुरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.

त्यानंतर सुमारे अर्धा तास श्रीकृष्ण नगर नदी पूल ते आमदार सुर्वे संपर्क कार्यालयापर्यंत विराट आशिर्वाद यात्रा काढण्यात आली. यावेळी फुलांनी सजवलेल्या जीपवर आरूढ होवून रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.तर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांची विराट संवाद यात्रा काढून शक्तिप्रदर्शन करत आगामी पालिका निवडणूकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.

त्यानंतर येथे झालेल्या जाहिर सभेत मुख्यमंत्री म्हणाले की,या सभेला हजारोंच्या संख्येने मागाठाणेचे नागरिक आले आहेत की सभेचे शेवटचे टोकाकडे नजर पोहचतच नाही. ही तर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्याची पोचपावती आहे. आम्ही गेल्या जून मध्ये बंड केले तेव्हा माझ्या खांद्याला खांदा देत ते माझ्या मागे खंबीर उभे राहिले आणि राज्यातील जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आले.राज्यातील कोविड निर्बध मुक्त करून निगेटिव्हीटी दूर करून सकारत्मकता आणून चार महिन्यात आम्ही विक्रमी लोकाभिमुख निर्णय घेतले.

येत्या नोव्हेंबरमुळे शिवडी नाव्हा शेवा हे ट्रान्स हाबरचे २२ किमीचे अंतर १५ मिनिटांत पार करता येणार असल्याने मुंबई कर रायगडला कोकणात अगदी कमी वेळात पोहचेल. तर ठाणे -बोरिवली टनेलमुळे भविष्यात सदर अंतर १० मिनीटांवर येईल. मुंबईचा चेहरा मोहरा बदलत असून ३३७ किमी मेट्रोच्या जाळ्यामुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संकल्पनेतील मागाठाणेचा सर्वांगिण विकास आगामी काळात होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. येथील प्रभाग क्रमांक ४ चा मीनाक्षी नाला रुंद करणे,येथील केतकी पाडा आणि संजय गांधी नॅशनल पार्कच्या नागरिकांचे पुनर्वसन करणे तत्पूर्वी त्यांना पाणी,वीज,शौचालय,लाईट आदी सुविधा देण्यासाठी तसेच नॅशनल पार्क मध्ये नागरिकांना चालण्यासाठी पैसे घेतले जातात ते बंद करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अन्य समस्या लवकर मार्गी लागण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री  म्हणाले की, समता नगरच्या स्कायवॉकमुळे प्रवासाचा वेळ आणि पैसे  वाचणार आहेत. मुंबईतील मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते होत आहेत. पुढील दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील सुशोभीकरणाचे कामे सुरू आहे. सर्वसामान्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी,आमदार प्रकाश सुर्वे,आमदार प्रवीण दरेकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शेडगे सर यांनी केले.

अशी आहेत श्रीकृष्ण नगर पूलाच्या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

बोरिवली (पूर्व) मधील श्रीकृष्ण नगर येथील दहिसर नदीवरील पूल हा पश्चिम द्रुतगती महामार्ग व श्रीकृष्ण नगर, नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, शांतिवन या भागाला जोडणारा पूल आहे. या परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी हा एकमेव महत्त्वाचा पूल आहे. सदर पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. एप्रिल २०२२ मध्ये जुना पूल निष्कासित करुन त्यानंतर पुलाचे विस्तारीकरण व पुनर्बांधणीचे काम तातडीने सुरु करण्यात आले. सदर संपूर्ण पुलाचे बांधकाम इंटिग्रेटेड डेक स्लॅब व ब्रीज पीलर पद्धतीने करण्यात येत आहे. पूर्ण पुलाची एकूण लांबी ४१.५ मीटर इतकी आहे. यामध्ये उत्तर व दक्षिण वाहिनीकरिता प्रत्येकी २ मार्गिका आहेत. स्पॅन लांबी ही १३.५० मीटर, १३.६० मीटर आणि १३.५० मीटर इतकी आहे.

संपूर्ण पुलापैकी, पहिला टप्पा ११ मीटर रुंदीचा असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २००० घन मीटर काँक्रिट वापरात आले आहे. तसेच ४९० मेट्रिक टन लोखंड (रिइन्फोर्समेंट), ३०० मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे. वाहतुकीसाठी या पुलाचे आत्यंतिक महत्त्व लक्षात घेता, पहिला टप्पा जलदगतीने पूर्ण करण्यात आला असून आता तो खुला देखील करण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील पुलाच्या कामाचा काही भाग वन विभागाच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) अंतर्गत येत आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. सदर प्रस्ताव प्रगतिपथावर आहे. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच दुसऱया टप्प्यात उर्वरित ११.३० मीटर रुंदीच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Web Title: Eknath Shinde: Stormy crowd at Eknath Shinde's meeting; MLA Prakash Surve's show of strength in Magathana shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.