Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 11:44 PM2022-07-03T23:44:10+5:302022-07-03T23:46:28+5:30

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे.

Eknath Shinde: Strategy for majority test, guidance to MLAs from Eknath Shinde | Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

Next

मुंबई - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली त्याबद्दल सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यानंतर, आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे. विधिमंडळ शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या निवडीला मान्यता देण्यात आली आहे. तर, अजय चौधरी यांची निवड विधिमंडळ सचिवालयाने अवैध ठरवली आहे. त्यामुळे, आता उद्या होणाऱ्या बहुतम चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, शिंदे गटाच्या प्रतोदने काढलेलाच व्हीप सर्व शिवसेना आमदारांना लागू होणार आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा शिंदेगट आणि भाजप आमदारांची बैठक पार पडली. 

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर आज सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबईतील हॉटेल ताज प्राईड येथे शिंदेगट आणि भाजप आमदारांची ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, बोलताना बहुमत चाचणीत सरकार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. 

विधानसभेत आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे प्रतोद भरतशेठ गोगावले, आमदार दीपक केसरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेना-भाजप युतीचे तसेच सहयोगी पक्षांचे आमदार उपस्थित होते.

बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय

आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे. आतापर्यंतच्या ज्या घटना घडल्या त्यात विरोधकांकडून सत्ताधारीत जाण्याच्या घडल्या आहेत. परंतु पहिल्यांदाच सत्तेतून पायउतार होण्याची घटना घडली. माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कुणावरची जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. ज्याला वाटलं त्यांना विशेष विमानानं परत पाठवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

विधानसभेत भाजपा नेत्यांचे मानले आभार

मला काही नको होतं, माझी कुठलीही अपेक्षा नव्हती. परंतु लोकशाहीत भारतीय जनता पार्टीने सन्मान करत वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. त्याचसोबत १०५ आमदार असूनही मुख्यमंत्रिपद देण्याचं काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, जे.पी नड्डा आणि भाजपाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Eknath Shinde: Strategy for majority test, guidance to MLAs from Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.