- अतुल कुलकर्णी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड करायचे, यासाठीची स्क्रिप्ट दोन महिने आधीच तयार करण्यात आली होती. त्यात प्रत्येक बारकाव्यावर चर्चादेखील झाली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांना आणि गृह विभागाला मात्र याची साधी कुणकुणही लागली नाही. या नियोजनामागे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयीची नाराजी हे मुख्य कारण होते.
गेल्या दीड वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्या मतदारसंघाला निधी दिला जात नाही, अशा तक्रारी सातत्याने आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत होते. जयंत पाटील यांच्याकडून कसा त्रास दिला जातो, आमदारांची कामे कशी अडवली जातात याच्याही तक्रारी ठाकरे यांच्याकडे पोहोचविण्यात आल्या. मात्र, त्यावर काहीच उपाय केला जात नव्हता. सरकार तीन पक्षाचे आहे की, फक्त राष्ट्रवादीचे..? असा सवालही यावेळी उपस्थित केला गेला. मात्र, फरक पडत नाही हे पाहून आमदारांची अस्वस्थता वाढत होती.
शिवसेनेच्या एका जबाबदार आमदाराने सांगितले की, राष्ट्रवादीकडून सेनेच्या आमदारांना मिळत असलेली वागणूक पाहता सगळ्यांनी एकत्रित बाहेर पडायचे हे ठरले होते. दोन महिने आधीच याचे नियोजन झाले होते. जे आमदार आज एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, त्या प्रत्येकाच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून काही ना काही त्रास दिला गेला आहे. कोकणात देखील राज्यमंत्री आदिती तटकरे आणि खा. सुनील तटकरे यांच्या पाठीशी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उभे राहिले त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमावर सेना आमदारांनी बहिष्कार घातला होता. गरज म्हणून हे सरकार स्थापन झाले असले तरी, राष्ट्रवादीसोबत फार काळ आपला घरोबा चालणार नाही, हे सातत्याने शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना सांगत होते. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेले नाही. नाराज आमदारांमध्ये मराठा आमदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. या सगळ्यांच्या असंतोषाला वाट मिळाली ती एकनाथ शिंदे यांच्या रूपाने.
एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्यात शिवसेनेचेच दोन मंत्री सातत्याने हस्तक्षेप करीत होते. आपल्या पसंतीचे अधिकारी आपण आपल्या जिल्ह्यातही बदलून घेऊ शकत नाही, ही तक्रार शिंदे सातत्याने करीत होते. ठाण्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या वेळी त्यांची नाराजी उफाळून आल्यानंतर त्यांना हव्या तशा बदल्या करून देण्यात आल्या होत्या. प्रत्येक फाइल मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेतल्याशिवाय पुढे द्यायची नाही, अशा स्पष्ट सूचना खात्याचे सचिव आणि आयएएस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे देखील शिंदे नाराज होते. त्यातूनच राज्यसभेत अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना मदत केली, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे अजित पवार की, एकनाथ शिंदे..? दोघांपैकी कोण आधी भाजपसोबत जाणार यावरून खासगीत चर्चा सुरू झाली आणि एकनाथ शिंदे यांनी पहिले पाऊल टाकले.
शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, शिंदे आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात सुरुवातीला असलेला उत्तम संवाद कालांतराने कमी झाला. आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांना सरकारमध्ये अधिक महत्त्व दिले जाऊ लागले. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदे यांना विश्वासात घेण्यात आले नाही. पक्षाने या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई तसेच युवा सेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्याकडे सूत्रे दिली. त्यामुळेही एकनाथ शिंदे दुखावले होते.
राज्यसभा आणि विधान परिषद या दोन निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार हॉटेलमध्ये एकत्र आले. त्यांच्याशी थेट बोलण्याची आयती संधी एकनाथ शिंदे यांना मिळाली. या निवडणुका झाल्या नसत्या आणि एकनाथ शिंदे आमदारांना स्वतंत्र भेटत राहिले असते तर त्यातून पडद्याआड काहीतरी सुरू आहे याची खबर लागली असती. त्यामुळे या दोन निवडणुकांच्या निमित्ताने एकत्र आमदारांसोबत बसून शिंदे यांना नियोजन करून दिले गेले. राज्यसभेच्या निवडणुकीतही शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत करणे हा त्याच स्ट्रॅटेजीचा भाग होता. विधान परिषदेच्या निवडणुकीतही शिवसेनेची मते फुटली. त्यामागे देखील ठरवून केलेली राजकीय खेळी असल्याचे शिवसेनेच्या नेत्याने स्पष्ट केले.
अजित पवार - फडणवीस यांची गुप्त भेट? उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद निवडणुकीच्या काळात रात्री उशिरा गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? हे कळाले नाही. मात्र, अशी भेट झाल्याची माहिती जेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळाली त्यावेळी दोघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.