मुंबई/गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विमानतळावरून रस्ते मार्गाने गडचिरोलीकडे त्यांनी प्रयाण केले. त्यानंतर, गडचिरोलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आढावा घेतल्याचं सांगितलं. तसेच, प्रशासनालाही सूचना केल्या आहेत. शिंदे-फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरुन सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेनं घेतलेल्या गडचिरोली दौऱ्याकडे सदाभाऊ खोत यांनी लक्ष वेधले.
वैनगंगा नदीच्या पुलावरुन केली पाहणी
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुलावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून त्यांनी पाणीपातळी आणि उपाययोजनासंदर्भात माहिती घेतली. तसेच, नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडून पूर्व विदर्भातील स्थितीची माहिती घेतली, नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, सर्व प्रकारची दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा व शासकीय कार्यालये सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले आहेत.