Eknath Shinde: ही मोठी शोकांतिका... आमदार गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:14 AM2022-10-13T11:14:51+5:302022-10-13T11:17:00+5:30
Eknath Shinde: बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते
मुंबई - भाजपचे आमदार आणि आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमचीच चर्चेत राहणारे आमदार गोपीचंद पडळकर हे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून माध्यमांतून दूर आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसटी संपातील निलंबित ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर, आता पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून अण्णाभाऊ साठेंच्या नावाने भायखळा येथे असलेल्या सभागृहाची शोकांतिका मांडली आहे.
बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. परंतु गेल्या तब्बल ३८ वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या भायखळा, मुंबई येथील नाट्यगृह बंद पडले आहे. त्या नाट्यगृहाची दुरवस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा अपमानच होतो. २०१४ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने यासाठीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर सभागृह उभं राहिलं. परंतु महाविकास आघाडी सरकारने ते काम रखडुन ठेवलं होतं, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याचसंदर्भात पडळकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
राज्यात आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं नाट्यगृह प्रेक्षकांसाठी सुरू करावे. हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊचा गौरव असेल, असे पडळकर यांनी शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.