मुंबई - अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचा १२ हजार ५०० वा प्रयोग मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे उत्साहात पार पडला. या नाटकाच्या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. तर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत धडाकेबाज फटकेबाजी केली. यावेळ, मुख्यमंत्री गुवाहटीतील नाट्यचे उदाहरण देताना आम्हीही काही दिवसांपूर्वी महानाट्य केलं, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अभिनेता आणि दिग्दर्शक रंगमंच कलाकार प्रशांत दामले यांच्या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच, उपस्थित सर्व कलाकारांचे आणि रसिक प्रेक्षकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाटकाला अनुसरुन राजकीय फटकेबाजीही केली. काही महिन्यांपूर्वी आम्हीही एक महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. देशभरात, जगभरात आम्ही फेमस झालो, पण तुमच्याएवढे नाही बरं का, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. यावेळी, सभागृहात एकच हशा पिकला. तसेच, तुम्ही नेहमीच ताजेतवाने दिसता. इतकी ऊर्जा कुठून आणता असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. "आमचंही असंच आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उशिरापर्यंत काम करायचे. आजही आम्ही काम करतो. शिवसेना भाजप युतीचे सरकार कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नाट्यगृहांच्या डागडुगीचं काम पूर्ण करू
प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील 51 नाट्यगृहांची दुरूस्थी करावी अशी अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ज्या नाट्यगृहांची दुरुस्ती डागडुजी आहे ती करू. तातडीने एक नोडल ऑफिसर नेमून या सगळ्या नाट्यगृहांची पाहणी केली जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.