एकनाथ शिंदे आज मुंबईत येणार; बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:03 AM2022-06-30T08:03:02+5:302022-06-30T08:05:29+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाणा फडकवत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी २१ जून रोजी सुरतमार्गे गुवाहाटी गाठले होते.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी मुक्कामी असणारे सर्व आमदार गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहेत. स्वत: एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईत दाखल झाल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाणा फडकवत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी २१ जून रोजी सुरतमार्गे गुवाहाटी गाठली. येथील हॉटेल ब्ल्यू रेडिसन येथे डेरेदाखल झालेले सर्व आमदार आज प्रथमच हॉटेलबाहेर पडले आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही बळजबरी केलेली नाही. इथे सर्व आमदार मोकळेपणाने वावरत आहेत. आम्ही सगळे शिवसेनेमध्येच आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत.
आपल्या देशात बहुमताला महत्त्व आहे. ते बहुमत आमच्याकडे आहे. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व जोपासण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.
बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार -
मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन मानवंदना देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील वंदन करणार आहोत. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळीदेखील जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.