मुंबई - ठाण्यातील महापौरपद गेले असते, भगवा उतरला असता. त्यासाठी आम्ही राजसाहेबांकडे गेलो. त्यात आमचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. त्यानंतर खूप त्रास आम्हाला सहन करावा लागला. शेवटी बाळासाहेबांनी आमची बाजू घेत या पोरांनी जे केलेय ते भगवा उतरू नये म्हणून केलंय असं म्हटलं असा किस्सा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिलदार वृत्तीचे बाळासाहेब सगळ्यांनी पाहिले. डावखरेंना विधान परिषदेवर बिनविरोध देण्यासाठी मी त्यांना घेऊन मातोश्रीवर गेलो. वसंत डावखरेंना विधान परिषद सदस्य, उपसभापतीपदासाठी मोठ्या मनाने बाळासाहेबांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांमागे कसं उभं राहायचं हे बाळासाहेबांकडून शिकलं पाहिजे. अन्याय झालेल्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहण्याचं काम बाळासाहेबांनी केले. मी राज ठाकरेंकडे गेलो, ठाण्याचा महापौरपद गेले असते. भगवा उतरला असता म्हणून केले. त्यानंतर खूप भोगावं लागलं. पण बाळासाहेबांनी म्हटलं भगवा उतरू नये म्हणून यांनी भेट घेतली असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे गुरुस्थानीबाळासाहेबांचे विचार ऐकताना अंगात ताकद, ऊर्जा येते. प्रत्येकाला प्रेरणा स्फूर्ती मिळते. अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळते. बाळासाहेबांबद्दल बोलताना कंठ दाटून येतो. बाळासाहेबांचे योगदान, आशीर्वाद पाठिशी असल्याने इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. बाळासाहेबांनी एकदा शब्द दिला की दिला. तो शब्द फिरवायचा नाही. हेच आम्ही त्यांच्याकडून शिकलो. महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या. धाडस महत्त्वाचं असते त्यासाठी ताकद हिंमत लागते. त्यासाठी गुरूही तेवढे ताकदवान लागतात. बाळासाहेब गुरुस्थानी होते. आनंद दिघेसाहेब असते तर आजचा कार्यक्रम बघून ऊर भरून आला असता. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि ठाणे जिल्ह्यात त्याचे पालन व्हायचे. ठाण्याने पहिली सत्ता शिवसेनेला दिली. ठाणे-शिवसेना हे नाते निर्माण झाले ते काही औरच होते. दिघेसाहेब गेल्यानंतर बाळासाहेब ठाण्यात आले तेव्हा हा एकनाथ शिंदे दिघेंच्या तालीमत तयार झालेला आहे. हे ऐकल्यावर ऊर भरून यायचा. इतका विश्वास होता. बाळासाहेब ठाकरे हिमालयाएवढे नेते होते असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे बारीक लक्ष होतंबाळासाहेबांचा फोन आल्यावर धडकी भरायची. ठाण्यात एक झाड तोडले तरी बाळासाहेब फोन करून विचारायचे. नागरी सुविधेच्या दृष्टीने बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे. ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली त्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे वाकडेतिकडे वागता येणार नाही असं बाळासाहेब सांगायचे. ठाण्यात २५ वर्ष सत्ता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे असं शिंदेंनी सांगितले.
बाळासाहेबांचा आदरयुक्त दरारा होताव्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या ब्रशच्या फटकाऱ्यातून, शब्दाच्या लेखणीतून कुणाची भिडभार ठेवायची नाही. बोलले की बोलले मागे हटायचं नाही. त्यांचा दरारा होता त्याचसोबत आदर होतो. व्यंगचित्राने अनेकांना घाम फुटायचा. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वास असंख्य विचारांचा मिलाप होता. ते खरे शिवभक्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानायचे. बाळासाहेबांना गडकिल्ल्यांबद्दल प्रेम होते. त्यामुळे हे किल्ले जतन करण्याची भूमिका सरकारने घेतली. बाळासाहेब हे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांचे गुणगान गात असू तर आनंद व्हायला पाहिजे. बाळासाहेबांचे नाव घेताना त्यांचे विचार पुढे नेताना आम्हाला कुठलीही तमा बाळगण्याची गरज नाही. विविध क्षेत्रात संकट आले तेव्हा बाळासाहेबांनी अनेक कलाकार, क्रिडा खेळाडूंना राजाश्रय देण्याचं काम केले. त्यामुळे अनेक क्षेत्रात बाळासाहेबांचे चाहते आहेत असं शिंदे यांनी सांगितले.