मीरारोड - कोरोना रुग्णां कडून मनमानी बिलांची वसुली करणाऱ्या खाजगी रुग्णालयां वर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांना दिले असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . हि वेळ एकमेकांना मदत करण्याची असून कुणी गैरफायदा घेत असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला .
मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्ग आणि पालिके कडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी मुख्यालयात बैठक घेतली . यावेळी खासदार राजन विचारे , आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , महापौर ज्योत्सना हसनाळे , आयुक्त डॉ . विजय राठोड , विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील आदी उपस्थित होते .
बैठकी नंतर शिंदे म्हणाले कि, चेस द व्हायरस मोहीम आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे . चाचण्या जेवढ्या वाढतील तशी रुग्णांची संख्या वाढेल. पण चाचण्या आणि सर्वेक्षण मुळे कोरोनाचे रुग्ण शोधले जातील . वेळीच रुग्ण सापडल्याने मृत्यूचे प्रमाण कमी करणे महत्वाचे आहे . शासना कडून वैद्यकीय साहित्य आदी दिले जात आहे . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासना कडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे शिंदे यांनी आश्वस्त केले .