मुंबई - भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठीएकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताच, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदें गटातील काही बंडखोर आमदारांसाठीही हा धक्काच होता. त्यामुळेच, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी हा सुखद धक्का होता, असे म्हटले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथेनंतर शिंदेंनी तात्काळ मंत्रालयात जाऊन बैठकही घेतली. त्यावेळी, जनहिताची कामं आणि लोकप्रतिनींधीच्या कामांना प्राधान्य देत असल्याचे म्हटले. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर बंडखोर आमदारांनीही जल्लोष साजरा केला. त्यात, उदय सामंत यांनी आज एक ट्विट करुन नात्यातील जबाबदाऱ्या सांगितल्या आहेत.
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होताच, त्यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले. तसेच, या आमदारांचे आभारही मानले. एकनाथ शिंदे गटात केवळ आमदारच नाही, तर मंत्रीही सहभागी झाले होते. शेवटच्या क्षणाला मंत्री उदय सामंत यांनी शिंदेगटात सहभागी होत शिवसेनेला मोठा धक्का दिला. आता, मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी उदय सामंतांना सुखद धक्का दिला आहे. तत्पूर्वी सामंत यांनी एक ट्विट केलं आहे. सामंतांचं हे सूचक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नात्यांमधील जबाबदारी काय असते, हे सांगितलं आहे.
नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात. पाहणे, आवडणे, हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. मात्र, सर्वात कठीण पाचवी पायरी आहे; ती म्हणजे "निभावणे"... असे सूचक ट्विट सामंत यांनी केले आहे. एकनाथ शिंदेंसोबत बंडखोर आमदारांनी चारही पायऱ्या पार केल्या आहेत. आता, निभावणे ही सर्वात कठीण पायरी शिल्लक आहे, ती ते कशी निभावतात हेच कदाचित सामंत यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केलंय, अशी चर्चा होत आहे.
सामंत यांना मिळालं गिफ्ट
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती. पुढील वर्षापासून या नवीन शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणे शक्य होणार आहेत. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तर, उदय सामंत यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
कशामुळे बाहेर पडले उदय सामंत
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचं उदय सामंत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.