मुंबई - राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर ठरल्यामुळे गेल्या अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली. मात्र, कोणकोणत्या नव्या चेहऱ्यांना एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रीपदाची संधी देण्यात येणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर शिंदे गटाने आपले पत्ते ओपन केले असून शिवसेनेत असताना आमदार राहिलेल्या आणि मंत्रीपदाची संधी हुकलेल्या दोन नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये, तानाजी सावंत आणि दिपक केसरकर यांना शिंदे गटाकडून प्राधान्याने पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आल्याचे दिसत आहे. भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात होती. तर, दुसरीकडे, शिंदे गटातून नेमक्या कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम होता. मात्र, अखेरच्या क्षणी मंत्रीमंडळातील नव्या नावांची यादी समोर आली आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत आणि दिपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे.
तानाजी सावंत हे बंडखोरीमध्ये पहिल्या फळीतील नेते होते, अनेकदा त्यांनी आपली नाराजी जाहीर सभांमध्ये बोलून दाखवली होती. तसेच, उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्यात ऐनवेळी त्यांचं नाव कापल्यानं ते नाराजी झाले होते. तर, दुसरीकडे दिपक केसरकर यांनाही मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने तेही शिवसेना नेतृत्त्वावर नाराजी होते. गत सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असूनही त्यांना यंदा संधी मिळाली नव्हती. अखेर बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाकडून या 2 आमदारांना मंत्री बनविण्यात आलं आहे. शिंदे गटाकडून 09 जणांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.
शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात
शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपाकडून पहिल्या टप्प्यात
गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.