'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 11:42 AM2023-05-09T11:42:36+5:302023-05-09T11:42:44+5:30

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray and Aditya Thackeray have paid tributes to Vishwanath Mahadeshwar. | 'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

'विश्वनाथ महाडेश्वरांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी'; शिंदे अन् ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अचानक जाण्याने शिवसेना ठाकरे गटात शोककळा पसरली आहे.

३-४ दिवसांपूर्वी विश्वनाथ महाडेश्वर त्यांच्या गावावरून परत आले होते. सोमवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. त्यानंतर तात्काळ महाडेश्वरांना व्हि एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी महाडेश्वरांचा मृत्यू झाला आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने महाडेश्वरांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांकडून मिळत आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनाची बातमी अतिशय वेदनादायी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबईचे माजी महापौर आणि कडवट शिवसैनिक विश्वनाथ महाडेश्वर जी ह्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी धक्कादायक आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम कामगिरी करणारे महापौर म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर मुंबईचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, महाडेश्वर २०१७ ते २०१९ काळात मुंबईचे महापौर होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवलं. महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Eknath Shinde, Uddhav Thackeray and Aditya Thackeray have paid tributes to Vishwanath Mahadeshwar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.