अतुल कुलकर्णी
निवडणूक आयोगाने शिवसेना कोणाची हा निर्णय देऊन टाकला. ज्या ज्या वेळी शिवसेनेच्या विरुद्ध काही घडले, त्या त्या वेळी शिवसैनिक पेटून उठले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे त्यांचे प्रेम दाखवून दिले. मुंबईत शिवसेनेला कायमच सहानुभूतीचा फायदा झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी, बाळासाहेबांच्या वेळेची शिवसेना आता राहिली नाही, असे विधान केले होते. तेव्हा शिवसैनिक पेटून उठला. स्वतःच्या पैशांनी वडापाव खात शिवसैनिकांनी महापालिकेत यश मिळवून दाखवले. त्याआधी १९८५ मध्ये वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात मुंबई आहे; पण मुंबईत महाराष्ट्र नाही, असे विधान केले होते. त्या विधानाचा राजकीय लाभ घेत परप्रांतीयांमुळे मराठी माणूस कसा अडचणीत आला, असा प्रचार शिवसेनेने केला. त्यात त्यांनी यश मिळवले.
२००७ च्या पालिका निवडणुकीत सेनेला अपयश मिळणार असे लक्षात आल्यानंतर, बाळासाहेब ठाकरे स्वतः मैदानात उतरले. सगळे चित्र पालटले. शिवसेना महापालिकेत सत्तेवर आली. ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकट आले त्यावेळी पक्षाने भावनिक मुद्दे उपस्थित करत यश मिळवले. मुंबईत शिवसेना आणि ठाकरे या नावाविषयीचा प्रत्येकाच्या मनात एक वेगळा कप्पा आहे. त्याला हात घालण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. मात्र त्यांचे हात भाजले. कारण दरवेळी बाळासाहेब ठाकरे पाठीशी असायचे. आज बाळासाहेब नाहीत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष हाताळणीविषयी पक्षातच टोकाचे मतभेद झाल्याने हे सगळे रामायण घडले आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले. मर्सिडीज गाडीच्या रूफ टॉपमधून बाहेर येत त्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली. त्याची तुलना कधीकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी जीपवर उभे राहून केलेल्या भाषणाच्या फोटोसोबत केली गेली. त्याचे परिणाम लगेच दिसणार नाही. त्यासाठी निवडणुकाच घ्याव्या लागतील. छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडली, त्यावेळी झालेले उत्स्फूर्त राडे महाराष्ट्राला माहिती आहेत. आज ती स्थिती नाही. भुजबळांच्या वेळेची रग असती तर चाळीस आमदार ज्या दिवशी बाहेर पडले त्याच दिवशी ती गावोगावी दिसली असती. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण अशी विचारणा होऊ लागली आहे. कोकणात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून हातापायी झाली. मुंबईतही शिवसेनेच्या शाखांमधून कोण बसणार, याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या शाखा एकतर त्या त्या विभागातल्या पदाधिकाऱ्यांनी उभ्या केल्या आहेत किंवा त्यांच्या मालकीच्या जागेत आहेत. त्यामुळे ते ज्या नेत्यासोबत जातील, शाखा त्यांच्यासोबत राहतील. शिवसेना भवन शिवाई ट्रस्टकडे आहे. त्यात ठाकरे कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे.
बाळासाहेब असताना जी भावनिक साथ शिवसेनेला मिळायची, त्या भावना आता आहेत का?, असा प्रश्न भाजपमधून विचारला जात आहे. आता जग व्यवहारी झाले आहे. तुमच्यासाठी आम्ही खटले का दाखल करून घ्यायचे? असा सवाल कार्यकर्ते विचारतात. मला काय मिळणार या पलीकडे कोणाकडेही विचार नाही. राष्ट्र प्रथम... नंतर पक्ष... शेवटी स्वतः हे सांगण्यापुरते आहे. ज्यांनी ज्यांनी पक्षांतर केले त्यांनी आधी स्वतःचा विचार केला आहे. त्यात पुन्हा भावना ही उत्स्फूर्त बाब ठरते. ती उफाळून येते आणि तेवढ्याच गतीने शांत होते. मनात उरते, ती ज्या गोष्टीमुळे भावना उफाळून आल्या त्याबद्दलची सल किंवा खंत... त्यावरही नंतर खपली बसून जाते. लोक त्याकडे दुर्लक्ष करू लागतात. मात्र कधी कोणी त्या खपलीला खाजवण्याचे काम केले, तर ती गळून पडते... त्यावेळी जखमेचे व्रण दिसतात. तीव्रता जाणवत नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यामुळे काल भावना उफाळून आल्या.
कदाचित काही दिवसांत त्या भावनांचा निचरा होईलही. आता उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही, अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला यश आले तर उद्धव ठाकरे अडचणीत येतील. मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून कालच्या हल्ल्यानंतर झालेल्या जखमा ताज्या राखण्याचे काम केले गेले, तर भावनेचे राजकारण कधी, कसे फिरेल सांगता येणार नाही. सुप्रीम कोर्टात या आठवड्यात सुनावणी सुरू होत आहे. त्यावरही भावनेचा हा पेंडुलम कुणीकडे कसा झुकेल, हे कळेल. या अशा वातावरणातही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांमध्ये टोकाची अस्वस्थता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जाणारे आनंद, उत्सव आणि टीकेचे बाण या लोकांना आणखी घायाळ करतील. तेव्हा आता खरी कसोटी शिंदे शिवसेनेतील नेत्यांची आहे. काँग्रेसमध्ये राजकारणावर भाष्य करताना विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे, काँग्रेसमध्ये श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. आज हे दोन शब्द शिंदेंच्या शिवसेनेसाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला भावनेची टाकी रिकामी होऊ द्यायची नाहीय.