मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत २ गट पडले आहेत. त्यामुळे यंदा २ दसरा मेळावा आयोजित करण्यात आले आहे. शिंदे गटाकडून बीकेसीत तर ठाकरेंकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित केला आहे. या दसरा मेळाव्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. मुंबईत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या सुरक्षेबाबत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की, मुंबईत २ मेळावे आहेत. त्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक मुंबईत येत आहेत. अत्यंत चांगल्यारितीने सर्वकाही शांततेत पार पडेल. आम्ही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दोन्ही मैदानात सुरक्षा व्यवस्था दिली आहे. अनेक वाहनं या मेळाव्यासाठी येणार असून त्यांच्या पार्किंगची व्यवस्थाही वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या सशस्त्र दलाकडून, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणी करतील. मागील ३ दिवसांपासून सर्व पोलीस अधिकारी मेहनत घेत आहेत. त्या मेहनतीला यश येईल. महिला पोलिसांचाही बंदोबस्तात मोठा सहभाग आहे. पोलीस खात्यासोबत अनेक स्वयंसेवी संघटना काम करतात. त्यात अनेक निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनाही बंदोबस्तात सहभागी करून घेतलं आहे. आम्ही सजग आहोत. सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. हा मेळावा शांततेत पार पडेल असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी व्यक्त केला.
ठाकरे-शिंदे येणार आमने-सामने ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले दसरा मेळाव्यात तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येण्यास आधीच सुरुवात झाली आहे. शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"