शिंदे-ठाकरेंचा सामना; भाजपने घेतली द.आफ्रिका अन् बांग्लादेश मॅचची मजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:06 AM2023-10-25T09:06:54+5:302023-10-25T09:12:43+5:30
भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विटही असंच सूचवत आहे.
मुंबईतील शिवसेनेचा दसरा मेळावा ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा होय. मात्र, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. त्यामुळे, गतवर्षीपासून मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यंदाचा आझाद मैदानावरील दसरा मेळावा. या दोन्ही दसरा मेळाव्यातून शिवसेना नेते एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसून आले. म्हणजेच, शिवसेनेतच सामना रंगला असून भाजपाकडून या सामन्याची मजा घेतली जात आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विटही असंच सूचवत आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करताना मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या द.आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश सामन्याशी संबंध जोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द. आफ्रिकेसारखी फलंदाजी केली, तर उद्धव ठाकरेंनी बांग्लादेशसारखी गोलंदाजी. वानखेडे स्टेडियमवरील द.आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यातील हा सामना मी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार आणि अमोल काळे यांच्यासमवेत एन्जॉय केला, असे मोहित कंबोज यांनी म्हटले.
मोहित कंबोज यांनी विश्वचषक स्पर्धेतील सामन्याशी संबंध जोडत शिवसेनेते रंगलेल्या राजकीय सामन्याची आठवण करुन दिली. तर, शिवसेनेतील ह्या राजकीय सामन्याची भाजपाकडून मजा घेतली जात असल्याचंच त्यांनी एकप्रकारे सूचवलं आहे. दरम्यान, आफ्रिकेने ५० षटकांत ५ बाद ३८२ धावां करत बांग्लादेश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. त्यामुळे, कंबोज यांनी शिंदेंची तुलना आफ्रिकेच्या फलंदाजीसोबत केली. तर, उद्धव ठाकरेंची बांग्लादेशच्या गोलंदाजीसोबत.
कल एकनाथ शिन्दे जी #SouthAfrica की तरह बैटिंग कर रहे थे और उद्धव जी #Bangladesh की तरह बोलिंग , Enjoyed the match in great company of Shri @ShelarAshish जी with @Amolkk1976 ji & other dignitaries at Wankhede stadium ! pic.twitter.com/Iciyk1DVk0
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) October 25, 2023
मुंबईतील शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला. तर, मुख्यमंत्री शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा केली. यावेळी, उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोलही केला.