Join us

Eknath Shinde Vs Shivsena: २० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात, अनिल देसाईंचा दावा, शिंदे गटात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 9:57 AM

Eknath Shinde Vs Shivsena: बंडखोर आमदारांमधील काही आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे नेते Anil Desar यांनी शिंदेंच्या गटातील २० बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 

मुंबई - तब्बल ४० च्या आसपास आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत आसाममधील गुवाहाटीतील हॉटेलमध्ये तळ ठोकल्याने सध्या शिवसेना नेतृत्व चिंतेत आहे. दोन तृतियांशहून अधिक आमदार फुटल्याने  एकीकडे विधिमंडळातील पक्ष पणाला लागला आहे. तर पक्षही हातून निसटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांमधील काही आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी शिंदेंच्या गटातील २० बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. 

शिंदे गटातील २० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा अनिल देसाई यांनी केला आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये बंडखोर आमदारांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. अशा परिस्थिती त्यांनी काही चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोर्टात जाऊन त्याला मज्जाव करू. तसेच एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी २० आमदार आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. आम्ही जेव्हा मुंबईत येऊ, तसेच जेव्हा मतदानाचा विषय निघेल तेव्हा आम्ही शिवसेनेला मतदान करू, असे या बंडखोर आमदारांनी सांगितलं आहे, असा दावा अनिल देसाई यांनी केला आहे. 

 तर बंडखोर आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करणाऱ्या अनिल देसाई आणि इतर शिवसेना नेत्यांना बंडखोर आमदारांचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे. जर बंडखोर आमदार तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना बोलावून घ्या असा टोला त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान, शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे हे सोमवारी स्पष्ट झाले.

टॅग्स :अनिल देसाईशिवसेनाएकनाथ शिंदे