मुंबई/गुवाहटी: भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे.
शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बैठकीला उपस्थित राहिलो नाही, म्हणून तुम्ही आमदारकी रद्द करण्याची मागणी करताय..असं कधी होतं का?, बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे म्हणून आमदारांचं निलंबन केलं जावं, असं देशात कोणतंही उदाहरण नाही. तसेच संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
Eknath Shinde: 'ती' महाशक्ती कोणती ते एकनाथ शिंदेंनी अखेर स्पष्टपणे सांगितलं, म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच हात असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या जे काही सुरु आहे, ती शिवसेनेचीच खेळी आहे. उद्धव ठाकरे यांनीत एकनाथ शिंदेंसह इतर आमदारांना गुवाहाटीला पाठवल्याची चर्चाही रंगली आहे, असा सवाल माध्यमांनी विचारला, त्यावर मला या चर्चांबाबत काही माहिती नाही, असं एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने एकनाथ शिंदेंशी आज फोनवरुन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
दरम्यान, बंडखोर १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. त्यासाठी दिलेल्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, महेश शिंदे, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आहे. शिवसेनेने बोलविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार-
१) आदित्य ठाकरे २) अजय चौधरी ३) रमेश कोरगावकर ४) उदय सामंत ५) वैभव नाईक ६) रवींद्र वायकर ७) उदयसिंह राजपूत ८) संतोष बांगर ९) भास्कर जाधव १०) सुनील राऊत ११) राजन साळवी १२) दिलीप लांडे १३) नितीन देशमुख १४) कैलास पाटील १५) राहुल पाटील १६) सुनील प्रभू १७) प्रकाश फातर्पेकर १८) संजय पोतनीस.