Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुढे काय? या आहेत तीन शक्यता, भाजपकडे ‘प्लॅन बी’ही तयार

By यदू जोशी | Published: June 22, 2022 08:35 AM2022-06-22T08:35:30+5:302022-06-22T08:37:03+5:30

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुढे काय? याची उत्सुकता लागली आहे. वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चाही होत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, असे समीकरण घडू शकते.

Eknath Shinde: What's next in state politics? These are the three possibilities, the BJP has prepared 'Plan B' | Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुढे काय? या आहेत तीन शक्यता, भाजपकडे ‘प्लॅन बी’ही तयार

Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुढे काय? या आहेत तीन शक्यता, भाजपकडे ‘प्लॅन बी’ही तयार

Next

- यदु जोशी 
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुढे काय? याची उत्सुकता लागली आहे. वेगवेगळ्या शक्यतांवर चर्चाही होत आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, असे समीकरण घडू शकते. शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये २६ ते ३० आमदार आहेत, पण आणखी आठ आमदार असे आहेत की, जे मुंबई वा इतर ठिकाणी असूनही ते शिंदेंसोबत असल्याचे म्हटले जात आहे. याचा अर्थ त्यांच्यासोबत जवळपास ३७ आमदार आहेत. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. शिंदेंसोबतच्यांना आमदारकी टिकवायची असेल तर ३७ हे संख्याबळ पुरेसे आहे. मात्र, ते सर्व शिवसेनेचे असायला हवेत. परंतु, त्यांच्यासोबत अपक्षही आहेत. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत दोन तृतीयांश आमदारांनी बाहेर पडून गट स्थापन केल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकत नाही.

शक्यता १
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडी सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा व शिंदे यांना मुख्यमंत्री करून महाविकास आघाडीचे सरकार चालू द्यावे, असा एक प्रस्ताव देऊ शकतात. पण तो ठाकरे मान्य करण्याची शक्यता दिसत नाही. एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू, असे सांगणारे ठाकरे हे सध्याच्या परिस्थितीत शिंदे यांना मुख्यमंत्री करतील असे वाटत नाही. कारण, त्याचा अर्थ ठाकरे यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले असा होईल. त्यामुळे सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न सफल होण्याची शक्यता दिसत नाही. ठाकरे यांच्या वर्चस्वाला तो मोठा धक्का असेल.

शक्यता २
ठाकरेंऐवजी शिंदे यांना मुख्यमंत्री केलेच तर ते काँग्रेसला मान्य नसेल असेही म्हटले जाते. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेस पार हादरली आहे. या निकालाने बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ते विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देऊ शकतात. नाना पटोले यांनी हंडोरे यांना उमेदवारी देण्याचा विशेष आग्रह धरला होता. काँग्रेसने एका जागेवर माघार घ्यावी यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी आग्रही होती. तथापि, पटोले यांनी त्यासाठी नकार दिल्याचे म्हटले जाते. विधान परिषद निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोप-प्रत्यारोप लवकरच बघायला मिळतील. हंडोरे हे निष्ठावान काँग्रेसी आहेत आणि त्यांच्या पराभवाची अत्यंत गंभीर दखल काँग्रेस श्रेष्ठींनी घेतली आहे.

शक्यता ३ 
समजा उद्या शिंदेंचे बंड थंड करण्यात शिवसेनेला यश आलेच (ज्याची शक्यता दिसत नाही) आणि शिंदे यांनी केवळ मंत्री म्हणून ठाकरेंच्या नेतृत्वात राहण्याचे मान्य केले तरी सरकारवरील धोका टळणार नाही. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपसोबत गेले नाहीत तर भाजपने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. तो ‘प्लॅन बी’ हा शिंदे यांच्या बंडापेक्षा कितीतरी वेगळा आणि मोठा धक्का देणारा असेल, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे बरेच आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात.
 

Web Title: Eknath Shinde: What's next in state politics? These are the three possibilities, the BJP has prepared 'Plan B'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.