मुंबई - राज्यातील शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता हा वाद विकोपाला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ही शिंदे गटाला देऊ केले. त्यानंतर, शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतले असून इतरही शिवसेना कार्यालयावर दावा करण्यात येत आहे. तर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडी पदही काढून घेण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान, आगामी रणनितीसंदर्भात शिंदे गटाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक आज होत आहे.
शिवसेना आणि त्याचा धनुष्यबाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झाला आहे. यामुळे आता शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांना लागू होणार की नाही यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीतच ठाकरे आणि शिंदे प्रकरणाने सर्वांनाच कोड्यात टाकले आहे. कायद्यांच्या पळवाटा शोधून शोधून त्याचा कस लावला जात आहे. असे असताना शिंदे गटाने शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हिप जारी करण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. प्रतोद भरत गोगावले त्याबाबतचा व्हिप जारी करणार आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच शिंदे गटाच्या शिवसेनेनं सर्वच आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. मुंबईत हॉटेल ताज येथे सायंकाळी ७.३० वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेता एकनाथ शिंदे हेही बैठकीला हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव घेण्यात येतील. त्यात, शिवसेना पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेंना बसवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे पद स्विकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, संध्याकाळच्या बैठकीनंतरच या सर्व गोष्टींचा उलगडा होईल.