Join us

Eknath Shinde : 'मातोश्री'वर जाणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं 'टायमिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 12:15 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात आपल्या सहकारी आमदारांसोबत सेलिब्रेशन केले, त्यांचे आभार मानले.

मुंबई - ते मुंबईत आले, मुख्यमंत्री झाले, शपथ घेतली अन् पुन्हा गोव्याला आपल्य साथीदार आमदारांकडे फिरकरले. होय, शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आटोपून पहाटेच गोवा गाठले. त्यावेळी, इतर सर्वच बंडखोर आमदारांनी त्यांची जंगी स्वागत केलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आश्चर्याचे अनेक धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. त्यातच, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात आपल्या सहकारी आमदारांसोबत सेलिब्रेशन केले, त्यांचे आभार मानले. त्यावेळी, बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत. कारण, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी, मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी मातोश्रीला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेल, असे वेळखाऊपणाचे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत. आता त्यांना सोबत घेऊनच शिंदे मुंबईला जाणार आहेत. विशेष म्हणजे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

फडणवीसांचं कौतुक

दरम्यान, राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, स्वत:कडे १२० आमदारांचे संख्याबळ असताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. फडणवीसांसारखी माणसे राजकारणात दुर्मीळ असल्याचे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा

उद्धव ठाकरेंना शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले होते. परंतू ते एकनाथ शिंदेंच्या शपथविधीला गेले नव्हते. मविआ सरकारचा शपथविधी होता, तेव्हा दुसऱ्यावेळी मुख्यमंत्री पद गमावलेले फडणवीस खुल्या दिलाने ठाकरेंच्या या सोहळ्याला आले होते. खरे म्हणजे आधीच्या मुख्यमंत्र्याने शपथविधीला येऊन कटुता संपविण्याची, नव्या सरकारला शुभेच्छा देण्याचा प्रघात आहे. फडणवीसांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. परंतू उद्धव ठाकरे शिंदेच्या शपथ सोहळ्याला आले नव्हते. परंतू उद्धव ठाकरेंनी ट्विट करून शिंदे आणि फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!'', असे ठाकरे म्हणाले. 

शपथविधीनंतर नेमकं काय म्हणाले शिंदे

-  राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.-  महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.-  एकीकडे सत्ता पक्ष, मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. अशावेळी या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. याच ताकदीने इतिहास घडविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. -  पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.-  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरेमुंबई