Join us

Eknath Shinde: वाह गुरू वाह... आता दिपाली सय्यद यांनीही घेतली CM एकनाथ शिंदेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 4:00 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दररोज धक्के बसत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही शिंदेगटात जाण्यासाठीची धडपड दिसून येते

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या राजकीय घडामोडीत अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील दरी वाढली असून शिवसेनेत आता स्थानिक पातळीवरही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे हे पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर, आदित्य ठाकरेही निष्ठा यात्रेतून संपर्कात आहेत. त्यावर, अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दररोज धक्के बसत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्येही शिंदेगटात जाण्यासाठीची धडपड दिसून येते. मंगळवारी मुंबईतील दहीसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाला परत येण्याचं आवाहन करणाऱ्या दिपाली सय्यद ह्याच शिंदे गटात सामिल झाल्या नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, द्रोपती मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून मिळावा, यासाठी शिंदेंनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी, असे दिपाली सय्यद यांनी सांगितले होते. तसेच, याकरीता आज आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, आज दुपारी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. या भेटीचा फोटोही समोर आला आहे. 

एकनाथ शिंदे आदरणीय

"एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील" असं म्हटलं आहे. तसेच "भाजपा आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. परंतू वाचाळवीरांना माफी मिळणार नाही" असा इशारा देखील दिपाली सय्यद यांनी दिला होता. 

शिवसेना आमदारांना घातली साद

दिपाली सय्यद यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना ट्विटरवरुन साद घातली होती. शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही. तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?, अशी विचारणाही सय्यद यांनी केली आहे. 

टॅग्स :मुंबईशिवसेनादीपाली सय्यदएकनाथ शिंदे