Eknath Shinde: होय, मी अंबादास दानवेला फोन केला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 06:18 PM2022-07-21T18:18:50+5:302022-07-21T18:20:41+5:30
मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनी केला होता
मुंबई/औरंगाबाद - शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासमवेत शिवसेनेचे 40 तर अपक्ष 10 असे एकूण 50 आमदार आहेत. त्यामुळे, या 50 आमदारांवर शिवसेनेतील इतर नेत्यांकडून टिका होत आहे. त्यावरुन, आता या आमदारांमध्येही वादविवाद दिसून येत आहेत. तर, आता 12 खासदारही शिंदे गटाला मिळाले आहेत. त्यानंतर, शिवसेनेचे विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांनीही एकनाथ शिंदेंकडून ऑफर आल्याची माहिती दिली होती. आता, स्वत: एकनाथ शिंदेंनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, होय, मी अंबादासला फोन केला होता, पण बंडखोरीसाठी नाही, असेही शिंदेंनी सांगितले.
मलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांचा फोन आला होता, असा गौप्यस्फोट अंबादास दानवे यांनी केला होता. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही जे माझ्यासाठी केले ते शिवसेना म्हणून केले, व्यक्तीगत थोडी केले, असे उत्तर आपण दिल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे बोलत ( Mla Ambadas Danve On Shinde Group Offer ) होते. औरंबादेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या माध्यमातून मेळावे आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, काहींनी आपल्याला शिंदे गटात जाण्यासाठी पैशांची ऑफर आल्याचेदेखील सांगितले. आता, दानवेंच्या फोनसंदर्भात एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
म्हणून मी दानवेंना फोन केला
मी अंबादास दानवेला फोन केला होता. पण, बंडखोरी करण्यासाठी नाही. मुळात आम्ही बंडखोर नाही, आम्ही शिवसेनाच आहोत. आता, अंबादास दानवेला मी फोन केला कारण, तो आमच्यासोबतच्या आमदारांच्या घरी फोन करत होता. आमदारांच्या पत्नी, मुलांना फोन करुन आमदारांना सांगा, असं म्हणत होता. त्यामुळे, मी त्याला फोन केला, तू काय त्या आमदारांचा बॉस आहे का, असा प्रश्न विचारण्यासाठी मी अंबादास दानवेला फोन केला होता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले