Join us

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 21:35 IST

Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत.

मुंबई - बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत झाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. त्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मुंबईत परतले असून आजच ते दिल्लीत पोहोचले आहेत. 

शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीसांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधाननरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे.  मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) पोहोचले आहेत. उद्या शनिवार (9 जुलै) रोजी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत भेट होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या भेटीत मुख्यत्वे चर्चा होणार असल्याचे समजते. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठिंबा दिला म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत.

दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या (Shinde Government) पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर समृद्धी महामार्गाचे उदघाटन आम्ही करू, अशी घोषणा फडणवीस यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली होती. तत्पूर्वीच, आता मोदी-शिंदेंची पहिली औपचारीक भेट होत आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीपंतप्रधानएकनाथ शिंदे